नवी दिल्ली, 20 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे. ज्यांनी हिंदू संस्कृतीला बदनाम करत दहशतवादी म्हणून हिणवलं त्यांना साध्वींच्या उमेदवारीने आम्ही उत्तर दिलं आहे,असं मोदींचं म्हणणं आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यातले शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या दिवशीच मोदींनी साध्वींच्या उमेदवारीबद्दल हे वक्तव्य केलं.
हेमंत करकरे यांना माझ्यासारख्या संन्याशाचा शाप भोवला, असं साध्वी म्हणाल्या होत्या. मी तुरुंगात गेल्यानंतर दीडच महिन्यात अतिरेक्यांनी हेमंत करकरेंना मारलं, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं.
'साध्वींच्या उमेदवारीला आक्षेप का?'
साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या प्रमुख आरोपी आहेत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे पण साध्वींच्या जामिनावरून मोदींनी थेट काँग्रेसवरच निशाणा साधला.
मोदींनी पंजाबमधल्या शीखविरोधी दंगलींची आठवण करून दिली. दिल्लीमध्ये लाखो निरपराध लोकांना मारलं गेलं हा दहशतवाद नाही का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण
सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेही नॅशनल हेरॉल्ड खटल्यामध्ये जामिनावर सुटले आहेत आणि निवडणूकही लढवत आहेत. मग त्यांच्यावर टीका झाली नाही, आता साध्वींवर मात्र टीका होते आहे याची आठवण त्यांनी करून दिली.
साध्वी प्रज्ञासिंह यांचा तुरुंगात छळ करण्यात आला तेव्हा कुणीच आक्षेप घेतला नाही. त्यावेळी यूपीए सरकार होतं आणि हिंदू दहशतवादाचा ठपका ठेवून साध्वी प्रज्ञासिंह यांना शिक्षा झाली होती. एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे त्यांच्याविरुद्ध आरोप लावण्यात आले आणि त्यांना खलनायिका ठरवण्यात आलं, अशी टीका मोदींनी केली.
गुजरातमध्ये एन्काउंटर केले गेले तेव्हाही अशाच पध्दतीने खोटा प्रचार करण्यात आला आणि जस्टिस लोया यांचा नैसर्गिक मृत्यू होऊनही त्यांना मारण्यात आलं, असा कांगावा करण्यात आला, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
सीपीआयने केला निषेध
पंतप्रधान मोदींनी साध्वींना समर्थन दिल्यानंतर सीपीआय पक्षाने त्यांचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी खटल्यांमध्ये साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर एवढे आरोप असतानाही त्यांना भाजपने उमेदवारी दिली याला आमचा आक्षेप आहे, असं सीपीआयने म्हटलं आहे.
==============================================================================================================
VIDEO: गुलालाची उधळण करत जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर!