कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली
6 जुलै : पगार कमी आहे म्हणून सहज लग्न न जुळण्याचे अनुभव सामान्यांना अनेकदा येतात, पण एखाद्या आमदाराचा पगार कमी आहे म्हणून त्याचं लग्न जुळले नाही, हे तुम्ही कधी ऐकले आहे का ? होय, हे सत्य आहे आणि तेही आपल्या देशातच हे घडतंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा गरिब आमदार आहे तरी कोण ?
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या आमदारावरच ही 'आप'बीती ओढवलीय. त्याचं झालं असं की, मंगळवारी दुपारी चार वाजता दिल्ली विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यावर 'आप'च्या आमदार राखी बिडलान आणि 'आप'चे इतर 'लग्नाळू' आमदार आपल्या जागेवर उभे राहिले आणि त्यांनी आमदारांचे वेतन वाढवण्याची मागणी केली. पण अध्यक्ष रामनरेश गोयल यांनी दाद न दिल्याने राखीने सभागृहातच आपल्या सहकारी आमदारांची कैफियत ऐकवली.
पगार कमी असल्याने जंगपुराचे 'आप'चे आमदार प्रवीणकुमार यांचं लग्न जुळत नसल्याचं त्यांनी सभाग्रहात सांगितलं, पण एवढी सगळी कहाणी ऐकूनही बिचारे अध्यक्ष महोदय फक्त सांत्वनच करू शकले. कारण आपचा आमदारांच्या चौपट पगारवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने यापूर्वीच फेटाळून लावलाय. दिल्लीतल्या आमदारांना सध्या सगळे भत्ते मिळून 70 हजार रुपये पगार मिळतो. केंद्राने पगारवाढीचा प्रस्ताव मान्य केला असता तर दिल्लीतल्या आमदारांचा पगार 2 लाखांच्यावर जाऊन पोहोचला असता...असो पण सध्या केंद्रात भाजपचं सरकार असल्याने हा प्रस्ताव मान्य होण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीयेत. कदाचित त्यामुळेच 'आप'च्या आमदारांनी ही लग्न जुळत नसल्याची शक्कल पुढे केली असावी. बघुयात लग्नाची सबब ऐकून तरी दिल्लीतल्या आमदारांचा पगार वाढतोय की नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा