Mission Paani : शेतकरी तामिळनाडूला दुष्काळापासून वाचवू शकतील - सद्गुरू

Mission Paani : शेतकरी तामिळनाडूला दुष्काळापासून वाचवू शकतील - सद्गुरू

Mission Paani तामिळनाडूला दोन अगदी परस्पर विरुद्ध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आधी पूर आणि आता दुष्काळ. अध्यात्मिक गुरू आणि लोकप्रिय लेखक सद्गुरू यांनी या समस्यांचा वेध घेऊन सुचवलेले उपाय..

  • Share this:

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि लोकप्रिय लेखक, विचारवंत ईशा फाउंडेशनचे सद्गुरू यांनी न्यूज18 ला सांगितलेले पाणी वाचवायचे उपाय आणि Mission Paani साठी त्यांनी सुचवलेला मार्ग -

गेल्या काही वर्षांमध्ये, आपण पहात आहोत की तामिळनाडूला दोन अगदी परस्पर विरुद्ध समस्यांचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर 2015 मध्ये, राज्यात प्रचंड विनाशकारी पूर आले होते. परंतु गेल्या दोन महिन्यात आपण पाहत आहोत की चेन्नईमधील पाणीसाठा संपत चाललेला आहे. अगदी 2016 मध्ये सुद्धा, तामिळनाडूला दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

आळीपाळीने येणारे हे दुष्काळ आणि पुराचे चक्र म्हणजे आपण पाण्याच्या व्यवस्थापनाकडे कसे दुर्लक्ष करत आहोत याचे उत्तम उदाहरण आहे. पाणी हे एक असे साधन आहे ज्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पण जेंव्हा पाण्याचे दूर्भिक्ष निर्माण होते तेंव्हाच आपण त्याबद्दल विचार करायला सुरवात करतो. जोपर्यंत आपण उत्तम व्यवस्थापन करत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अखंडपणे उपलब्ध करणे अशक्य.

नद्या, तलाव आणि विहिरी हे काही पाण्याचे स्त्रोत नाहीत. ती पाण्याची गंतव्य स्थाने आहेत. या देशात, पावसाळ्यात पडणारा पाऊस हाच आपला पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. हिमालयातील बर्फ वितळून मिळणार्‍या 4% पाण्याचा अपवाद केला, तर उर्वरित 96% पाणी 50-60 दिवसात पडणार्‍या पावसामधून मिळते. हे पाणी आपण संपूर्ण 365 दिवस साठवून ठेवणे अपेक्षित आहे.

आपल्याला जर हे पाणी साठवून ठेवायचे असेल, सध्या आपण धरणांद्वारे तसे करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आपल्या धरणांमध्ये जवळजवळ 20% गाळच साठलेला आहे. कृत्रिम पद्धती दीर्घकाळासाठी उपयोगी पडणार नाहीत. पाणी जमिनीत मुरून ठेवण्याचा एकमेव शाश्वत मार्ग म्हणजे जमीनीवर पुरेशी हरित आवरणे निर्माण करणे. वृक्ष-वनस्पतींचा कचरा आणि प्राण्यांची मुत्र-विष्ठा अशा गोष्टींद्वारे जमीन जर सेंद्रिय पदार्थांनी संपन्न असेल, तर पाणी अडवून ठेवले जाईल, जे मग जमिनीत मुरून नंतर नदी पत्रात हळू हळू प्रवाहित होईल.

म्हणजेच नदी हा पाण्याचा स्त्रोत नाही, तर ते त्याचे गंतव्य स्थान आहे. पाणी त्याच्या गंतव्य स्थानापर्यन्त जितके हळूहळू पोहोचेल, त्यानुसार वर्षातील किती दिवस पाणी नदीमध्ये शिल्लक राहील हे ठरेल. सध्या जंगलांची संख्या पुरेशी नाही, त्यामुळे पावसाचे पाणी नदीतून वेगाने वाहून जाते, आणि त्यामुळे पुर येतात.

तामिळ भाषेत कावेरीबद्दल एक अतिशय सुंदर म्हण आहे: ”कावेरी जर चालत आली, ती समृद्धी घेऊन येते. ती जर धावत आली, तर ती एक मोठी आपत्ती आहे.” तिच्या पाणलोट क्षेत्रात पुरेशी जंगले असली तरच तुम्ही तिच्या प्रवाहाचा वेग कमी करू शकता. पाणलोट क्षेत्र म्हणजे केवळ नदीच्या उगमस्थानी असणार्‍या प्रदेशातील जंगले नव्हेत. उष्ण कटिबंधातील प्रत्येक चौरस इंच भूभाग म्हणजे पाणलोट क्षेत्र. ज्या ठिकाणी झाडे आणि इतर वनस्पती आहेत, तिथे जमिनीत पाणी मुरेल. जर झाडेच नसतील, तर पाणी वेगाने वाहून जाईल.

आजवर केलेल्या अनेक परीक्षणांतून हे सिद्ध झाले आहे की एखाद्या भूप्रदेशात 10,000 झाडे असतील, तर त्या प्रदेशाच्या जमिनीत 38 लाख लीटर पाणी जमिनीत मुरेल. कावेरीने 83000 चौरस किलोमीटर व्यापला आहे आणि त्यापैकी आपण 87% जमिनीवरील झाडांची तोडणी केली आहे. आपण किती पाणी गमावत आहोत याची जरा कल्पना करा! आपण पाण्याच्या कमतरतेकडे केवळ उन्हाळ्यातच पाहायला पाहिजे असे नाही. पावसाळा संपल्यानंतरच्या काळात किती प्रमाणात पाणी वाहून जाते त्याकडे लक्ष द्या. तेंव्हाच आपल्या मनात धोक्याची घंटा वाजली पाहिजे. दुर्दैवाने, जेंव्हा आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तेंव्हाच आपण जागे होतो.

चेन्नईचे उदाहरण घ्या. असे म्हणतात की एके काळी चेन्नाईत 1500 पेक्षा अधिक तलाव आणि सरोवरे होती. आज आपल्याला त्यापैकी एकही सापडत नाही. याचे कारण म्हणजे आपण पाण्याच्या प्राकृतिक प्रवाहांचा अभ्यास न करता बेजबाबदारपणे शहरे विकसित केली आहेत.

आता आपण झटपट प्रतिक्रियांद्वारे कृती करत आहोत. आपण अनेक लोकांना तलाव आणि सरोवरांची खोली वाढविण्याविषयी बोलताना पाहतो. हे केवळ तमिळनाडुमध्येच आहे असे नाही, तर सर्वत्रच असे घडते आहे. या गोष्टी करणे आवश्यक आहे, पण आपण जर मूलभूत गोष्टीच लक्षात घेतल्या नाहीत, तर या सारखे उपाय फार काळ उपयोगी पडणार नाहीत.

जमिनीखालून तलावांच्या दिशेने पाण्याचे काही प्रवाह वहात असत ज्यामुळे तलावात वर्षभर पाणी असे. ते सर्व प्रवाह आता नष्ट झाले आहेत कारण आपण त्यांवर घरे आणि इमारती बांधल्या आहेत. तुम्ही तलावांची खोली वाढवली, तर त्यामुळे त्यात केवळ पावसाळ्यात पाणी येईल पण वर्षातील इतर वेळी त्यात पाणी वाहून येणारच नाही.

७० लाख लोकसंख्या असणारे शहर पाण्यासाठी केवळ 2 मोठ्या जलाशयांवर अवलंबून आहे हा काही शाश्वत मार्ग नाही. आपण जमिनीमधील पाण्याची पातळी वाढवण्याचे प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे. पण पावसाचे पाणी जमिनीत मुरले, तरच तसे शक्य आहे. इतर कोणताही मार्ग नाही. अल्पकालीन उपाय म्हणून आपण छोटी धरणे बांधून, जमिनीची भौगोलिक आखणी लक्षात घेऊन  पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण मूलभूत गरज वनीकरण करणे ही आहे – स्थानिक गवत, झुडपे आणि झाडांच्या प्रजाती – याची आवश्यकता आहे.

याचा अर्थ असा आहे का, की आपण पुन्हा सर्वत्र जंगले निर्माण केली पाहिजेत? ते शक्यच नाही. यापुढे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे वनशेती. आपण जर शेतकर्‍यांना सेंद्रिय झाडांवर आधारित शेती करायला प्रोत्साहन दिले, तर प्राणी आणि झाडांपासून मिळणारे सेंद्रिय पदार्थ मातीचे सतत पुनरुज्जीवन करत राहतील.

झाडांवर आधारित शेती केल्याने केवळ माती आणि नदीचे पुनर्भरण होईल असे नाही, तर त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात देखील तीन ते आठ पटीने वाढ होईल. जऱ शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवू शकणारी झाडांवर आधारित शेती मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात निर्माण झाली, तर साहजिक संपूर्ण देशातील शेतकरी त्या पद्धतीची शेती करण्यासाठी तयार होतील.

आणि म्हणूनच आम्ही “कावेरी कॉलिंग” ही मोहीम सुरू करत आहोत. आम्ही कावेरी नदीच्या पूनरुज्जीवनावर लक्ष केन्द्रित केले आहे. आम्हाला जगाला हे दाखवून द्यायचे आहे, की दहा ते बारा वर्षांच्या काळात, तुम्ही खरोखरच नदीचे मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवन करू शकता, आणि त्याच वेळी शेतकर्‍याचे उत्पन्न सुद्धा अनेक पटींनी वाढू शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पर्यावरण विरुद्ध अर्थकारण अशी शर्यत नाहीये. जमीन मालकांसाठी पर्यावरणाचे पुनरुज्जीवन अतिशय फायदेशीर ठरू शकते. आम्ही हेच घडवून आणायचा प्रयत्न करत आहोत.

परंतु तरीदेखील, शेतकर्‍यांना हा बदल घडवून आणण्यासाठी मदतीची आवश्यकता भासेल. शेतकरी फक्त त्याच्या उपजीविकेसाठी कष्ट करतो. त्याच्याकडून आपण त्याने नदी किंवा पर्यावरणाचे रक्षण करावे अशी अपेक्षा करू शकत नाही. शासनाने त्यासाठी शिक्षण आणि पुढील तीन ते पाच वर्षे आर्थिक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

माझ्या अगदी लहानपणापासून, मी निसर्गाच्या, जंगलांच्या आणि नद्यांच्या, विशेषतः कावेरी नदीच्या खूपच निकट सहवासात राहिलो आहे. मी जेव्हा आज नदीची ही दयनीय स्थिती पहातो, तेंव्हा माझं हृदय पिळवटतं. आपल्या नद्या ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे याची आपल्याला जाणीव होणे आवश्यक आहे. पाणी ही काही वस्तु नव्हे, ते तर आपले जीवन आहे. तुम्ही पाण्यापासूनच निर्माण झाला आहात. या पृथ्वीवर, नद्या, पाण्याची अशी ठिकाणे आहेत ज्यांच्याशी आपला अतिशय निकटचा संबध राहिला आहे. हजारो वर्षे या नद्यांनी आपली काळजी घेतली आहे आणि आपले पालनपोषण केले आहे. नद्यांची काळजी घेऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी आपण घेण्याची आता वेळ आली आहे. कावेरी तुम्हाला बोलावते आहे, तिच्या हाकांकडे तुमचे लक्ष आहे का?

(लेखक सद्गुरू हे भारतातील सर्वात प्रभावशाली पन्नास व्यक्तींमध्ये समावेश असलेले एक योगी, गूढवादी विचारवंत आणि लोकप्रिय लेखक आहेत. 2017 साली, सद्गुरूंना भारत सरकारतर्फे 'पद्म विभूषण' या सर्वोच्च वार्षिक नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे.)

First published: July 18, 2019, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading