कानपूर (उत्तर प्रदेश), 8 मे : एका मंदिराजवळ कुटीत राहणारे म्हातारबाबा सोमवारी मरण पावले म्हणून आसपासच्या लोकांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि अचानक ते मृत्युशैयेवरून उठून बसले. ही गोष्ट नाही, खरी घडलेली घटना असल्याचं कानपूरच्या रसूलाबाद तालुक्यातल्या एका गावतल्या लोकांचं म्हणणं आहे.
कानपूरच्या रसूलाबाद तालुक्यात एका कुटीत राहणारे म्हातारबाबा गेल्या 15-20 वर्षांपासून देवळात आश्रयाला होते. त्यांचं नाव नारायण बाबा असल्याचं सांगतात. ते 115 वर्षाचे असल्याचं कुणी सांगतं तर कुणी त्यांचं वय 120 असल्याचं सांगतं. स्वतः नारायण बाबा आपलं वय नेमकं माहीत नसल्याचं सांगतात. बऱ्याच दिवसांपासून या बाबांनी अन्नत्याग केला आहे. फक्त फळं आणि पाणी पिऊन ते जगतात. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या शरीराच्या हलचाली बंद झाल्या आणि त्यांचं निधन झाल्याचं परिसरातल्या लोकांना समजलं. साऱ्या गावात त्यांच्या मृत्यूची बातमी पोहोचली.
हे नारायण बाबा देवळात राहात असल्यानं त्यांना त्याजवळच समाधी द्यायची ठरली. त्यानुसार दफनाची तयारी झाली. खड्डा खणण्यात आला. अंत्यसंस्कारांची सर्व तयारी होत आली. एखादा चमत्कार वाटावा असं निपचित झाल्यानंतर तब्बल चार तासांनी हे नारायण बाबा चक्क उठून बसले. परिसरात या मृत्यूशैयेवरून उठणाऱ्या बाबांची जोरदार चर्चा आहे.