नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी: कोरोना साथीमुळे ओढवलेल्या संकटानं अनेकांचे मानसिक स्वास्थ हरवलं. आर्थिक घडी विस्कटल्यानं अनेकांना रोजी रोटीची चिंता भेडसावू लागली तर अनेकांना भविष्याच्या काळजीनं हैराण केलं. याशिवाय या आजाराबाबतचे गैरसमज, भीती, लॉकडाउनमुळं आलेली बंधन यामुळं अनेकजण नैराश्याच्या गर्तेत गेले. त्यामुळं आत्महत्यांचं प्रमाण वाढलं. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं (Ministry Of Social Justice and Empowerment) 7 सप्टेंबर 2020 रोजी मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) मार्गदर्शन करणारी ‘किरण’ (1800-599-0019) ही हेल्पलाइन (Helpline) सुरू केली. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते या हेल्पलाइनचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या हेल्पलाइनला येणाऱ्या कॉल्सपैकी 70 टक्के कॉल्स हे पुरुषांचे असल्याचं मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालात (Ministry Report) स्पष्ट झालं आहे.
दी हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार, या अहवालात देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, या हेल्पलाइनवर आलेल्या कॉल्समध्ये पुरुषांच्या (Men) कॉल्सचे प्रमाण अधिक होतं. तसंच या कॉल्सपैकी 32 टक्के कॉल्स विद्यार्थ्यांचे (Students) असल्याचंही पुढं आलं आहे. 16 सप्टेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या काळात या हेल्पलाइनवर 13 हजार 550 कॉल्स आले होते. त्यापैकी 70.5 टक्के कॉल्स हे पुरुषांचे, तर 29.5 टक्के कॉल्स महिलांचे (Women) होते. मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी एक हजार 618 फॉलो-अप कॉल्स केले. सर्वाधिक 75.5 टक्के फोन करणारे लोक हे 15 ते 40 वर्षे वयोगटातील होते, तर 18.1 टक्के लोक हे 41 ते 60 वर्षे वयोगटातील होते, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
हे ही वाचा-पुणे पोलिसांनी वर्दीवरील डाग पुसला, दीड महिन्यांनंतर 'त्या' चोरट्यांना अखेर अटक
फोन करणाऱ्यांपैकी 65.9 टक्के लोकांना मध्यम स्वरूपाच्या तणावाचा त्रास होता, तर 26.5 टक्के लोकांना थोडा जास्त मानसिक ताण असल्याचं जाणवलं, तर 7.6 टक्के लोकांना तीव्र स्वरूपाचा त्रास होता. फोन करणाऱ्यांमध्ये 32.3 टक्के विद्यार्थी होते, 15.2 टक्के व्यावसायिक होते, तर 27.1 टक्के नोकरी करणारे आणि 23.3 टक्के लोक बेरोजगार होते. 1.4 टक्के गृहिणी होत्या तर 0.7 टक्के लोकांनी त्यांच्या कामाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. बहुतांश म्हणजे जवळपास 78.2 टक्के लोकांना स्वतःसाठी मदत हवी होती, तर उर्वरीत लोकांनी आपले पालक, भावंड, पत्नी किंवा इतरांसाठी मदत घेण्याकरता फोन केला होता. फोन करणाऱ्यांपैकी 28.5 लोकांना चिंता (Anxiety) अँक्झायटी, 25.5 टक्के लोकांना औदासिन्य (Depression),7.8 टक्के लोकांना कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही मानसिक त्रास जाणवत होते, तर 2.8 टक्के लोकांमध्ये आत्महत्येची मानसिकता वाढली होती. 3.4 टक्के जणांमध्ये अत्याचारामुळं उदभवलेले आजार होते, तर उर्वरीत 32 टक्के लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक त्रास दिसून आले, असं या अहवालात म्हटलं आहे.
हे देखील वाचा - PM Kisan Samman Nidhi: सरकार 'या' शेतकऱ्यांकडून 2,336 कोटी करणार वसूल
सर्वाधिक 40.32 टक्के कॉल्स उत्तर विभागाकडून, त्यानंतर पश्चिम विभागातून 27.08 टक्के, दक्षिण विभागातून 16.99 टक्के, पूर्व विभागातून 11.28 टक्के आणि ईशान्येकडून 4.33 टक्के कॉल्स आल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
डीईपीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, हेल्पलाइनवर 31 जानेवारीपर्यंत कॉल्सची संख्या वाढून 15 हजार 170 झाली असून, आतापर्यंत 1हजार 978 केसेसमध्ये पाठपुरावा करण्यात आला आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर हेल्पलाइनवर कार्यरत एका मानसशास्त्रतज्ज्ञानं सांगितलं की, बहुतेक कॉल तरुण प्रौढ लोकांचे होते. कोरोना साथीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची काळजी वाटत होती, तसंच संवाद होत नसल्यानं त्यांच्यामध्ये चिंता आणि नैराश्याचं प्रमाण अधिक होतं.
हरियाणाच्या डीईपीडब्ल्यूडी क्षेत्रीय केंद्रात काम करणारे आणखी एक मानसशास्त्रज्ञ म्हणाले की, विद्यार्थी हा कॉल करणार्यांमध्ये विद्यार्थ्यांचे आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक होते. कुटुंबातील वाढते ताणतणाव आणि चिंता या समस्या त्यांना जाणवत होत्या.
दिवसातले 24 तास आणि 12 महिने सुरू असणारी ही हेल्पलाइन लवकर निदान, प्राथामिक मानसोपचार, त्रासाचं व्यवस्थापन कसं करावं याबाबत मार्गदर्शन करते. यासाठी 81 मानसोपचार तज्ज्ञांसह (Psychiatrists)अनेक क्लिनिकल आणि पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत, अशी माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.