मिग – 21 या लढाऊ विमानाला राजस्थानमध्ये अपघात झाल्यानंतर मिग विमानांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये या विमानाला अपघात झाला.विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचं कळताच पायलटने त्याची सुटका करून घेतली.
या विमानाला अपघात का झाला हे अजून कळू शकलेलं नाही पण मिग विमानांच्या सततच्या अपघातांमुळे या विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच या विमानांना 'उडत्या शवपेट्या' असं म्हणतात.
ही विमानं कोसळण्याच्या घटनेमुळे भारतीय हवाई दलाला आतापर्यंत 171 पायलट्स गमवावे लागलेत तर 31 नागरिकांचा मृत्यू ओढवला आहे.
1963 पासून ते 2015 पर्यंतची या विमानांच्या अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. रशियन बनावटीची ही विमानं 50 वर्षांहून अधिक काळ हवाई दलाच्या सेवेत आहेत.
आतापर्यंत या विमानांना 210 वेळा अपघात झाले. भारत रक्षक या डाटा गोळा करणाऱ्या संस्थेने भारतीय लष्कराकडूनच ही माहिती मिळवली आहे. यापैकी 1999 मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 16 विमानं दुर्घटनाग्रस्त झाली. हे अपघात तांत्रिक कारणांमुळे आणि मानवी चुकांमुळे झाले, असंही या आकडेवारीत म्हटलं आहे.
गेल्या सहा महिन्यांत दोन मिग विमानं अपघातग्रस्त झाली. गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला 2 मिग विमानं कोसळण्याची घटना घडली होती.
पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हेही मिग -21 बायसन हे विमान चालवत होते. अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F- 16 हे विमान पाडलं पण त्यात त्यांचंही विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यांना पॅराशूटच्या मदतीने सुटका करून घ्यावी लागली.
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या हद्दीत एफ – 16 विमानं घुसवून हल्ला चढवला. त्याला उत्तर देताना ही घटना घडली. हे मिग विमान ताफ्यातून निवृत्त होण्याची वेळ आलेली असतानाही ते अपग्रेड करून त्याला वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. या विमानासारखीच आणखीही मिग विमानांना अशीच मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही विमानं सारखी अपघातग्रस्त होतायत.
ही विमानं अजूनही हवाई दलाच्या ताफ्यात का आहेत, असा प्रश्न विचारला जातो. पण संरक्षण करारांची प्रक्रिया लांबत चालल्यामुळे नवी लढाऊ विमानं हवाई दलाच्या ताफ्यात येऊ शकलेली नाहीत.वाढत्या दुर्घटना पाहता भारतीय हवाई दलाला या विमानांबददल काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे.
=============================================================================================