नवी दिल्ली, 08 मार्च: बिकानेर येथील शोभासर येथे भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले. बिकानेर येथील नाल विमानतळाजवळ लढाऊ विमान कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरून एक मोठा आवाज आला आणि धुर आल्याचे लोकांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेतली आहे.
भारतीय हवाई दलाच्या नाल येथील तळावरून मिग-21ने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. त्यानंतर काहीच मिनिटात ते कोसळले. वैमानिक ऐन वेळी मिग-21मधून बाहेर पडल्याने तो सुरक्षित असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
याआधी 12 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधीलच जैसलमेर येथे पोखरण परिसरात मिग-27 विमान कोसळले होते. तेव्हा वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडला होता. मिग-27 हे रशियन बनावटीचे विमान आहे. भारताने 1980 च्या दशकामध्ये या विमानाची खेरदी केली होती. 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी याचा चांगला उपयोग झाला होता. या लढाऊ विमानाने पर्वतावर असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला केला होता.