Menstrual Hygiene Day 2019 : या देशात स्त्रियांना मिळते मासिक पाळीची सुट्टी

Menstrual Hygiene Day 2019 : या देशात स्त्रियांना मिळते मासिक पाळीची सुट्टी

मासिक पाळीच्या दिवसात स्त्री कर्मचाऱ्यांना जादा सुट्टी द्यावी का? हा अनेक देशांमध्ये अजूनही वादाचा मुद्दा असला, तरी असे काही देश आहेत, जिथे ही हक्काची सुट्टी स्त्रियांना मिळते.

  • Share this:

मुंबई, 28 मे : दर महिन्यात चार दिवस मासिक पाळीच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. मासिक पाळीदरम्यान पोट दुखणं, कंबर दुखणं, क्रँप्स, पाय दुखणं, थकवा असे अनेक त्रास होतात. अर्थात सगळ्या स्त्रियांना असे त्रास होत नाहीत. पण मासिक पाळीदरम्यान थकवा येण्याचा त्रास बहुतांश स्त्रियांना होतो. या दिवसांत एक तर त्यांची कार्यक्षमता कमी होते, किंवा ओढून ताणून काम केल्यानं शरीर आणखी थकतं. त्याचा मानसिक ताणही येतो. बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी किंवा मासिक पाळीदरम्यान मूड स्विंगसारख्या मानसिक तणावाच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. पण पीरिअड राईट्स अर्थात मासिक पाळीचा अधिकार याविषयी अजून आपल्याकडे खुलेपणानं बोललं जात नाही. जे बोललं जातं ते फक्त कपड्याऐवजी सॅनिटरी पॅड वापरणं एवढ्यापुरतं मर्यादित असतं.

जगात असेही काही देश आहेत, जिथे स्त्रियांच्या आरोग्याचा विचार होतो आणि म्हणूनच त्यांना मासिक पाळीच्या दिवशी सुट्टी घेण्याची मुभा असते. पीरिअड लिव्ह देणारे हे देश कोणते ते पाहा खालच्या परिच्छेदात. मासिक पाळीची सुट्टी किंवा मेन्स्ट्रुअल लीव्ह किंवा पीरिअड लिव्ह द्यावी की नाही, याबद्दल युरोपीय देशात अजूनही मतभेद आहेत. पण काही आशियायी देशांनी मात्र ही पद्धत अगदी कायदे करून अंमलताही आणली आहे, हे वाचून नवल वाटेल.

भारत : आश्चर्य वाटेल, पण भारतातही पीरिअड लिव्ह हा प्रकार सुरू झाला आहे. मुंबईतली कल्चर मशीन आणि गोझूपा Gozoopa ही डिजिटल मार्केटिंग करणारी कंपनी अशी सुट्टी देते.

जपान : स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देणारा जपान हा पहिला देश. 1947 ला त्यांच्याकडच्या कामगार कायद्यात बदल करण्यात आला आणि ज्या महिलांना वेदनादायी पाळी येते, त्यांना सिरिक्युका म्हणजे फिजिऑलॉजिकल लिव्ह देण्यात येते. दुसऱ्या महायुद्धापासून अशी सुट्टी तिथे देण्यात येत आहे.

HSC Result : इथे चेक करा तुमचा निकाल फक्त एका क्लिकवर

दुष्काळावर मात करण्यासाठी आलंय 'तुफान', गावकरी करताहेत रात्रीचा दिवस

बारावीत अपयश आलंय? हिंमत हारू नका, या लोकांचा आदर्श घ्या!

इंडोनेशिया : या देशात मासिक पाळीची सुट्टी देण्यासंदर्भात विशेष कायदा नसला, तरी महिलांना महिन्यातून दोन दिवस सुट्टी देण्याची तरतूद आहे. काही कंपन्या या कायद्याकडे दुर्लक्ष करतात, हा भाग वेगळा.

तैवान : या देशात वर्षभरात कामगारांना 30 सुट्ट्या दिल्या जातात. या व्यतिरिक्त महिला कामगारांना अधिकच्या 3 सुट्ट्या घेण्याची मुभा आहे. लैंगिक समानता कायद्याअंतर्गत मासिक पाळीची ही सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.

दक्षिण कोरिया : या देशाने सर्वप्रथम 2001 मध्ये मासिक पाळीची सुट्टी देण्याची पद्धत सुरू केली. पण ही अशी जादा सुट्टी देणं म्हणजे पुरुषांवर अन्याय असल्याची भावना तिथल्या पुरुष हक्क चळवळीने व्यक्त केली आहे. स्त्रियांनी ही मासिक पाळीची सुट्टी घेतली नाही, तर त्याबदल्यात त्यांना त्याचे पैसेही दिले जातात.

झांबिया : स्त्रियांसाठी रोजगाराचं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने नवीन कायदा करून मासिक पाळीची सुट्टी देणारा हा एक देश. दर महिन्याला स्त्री कर्मचाऱ्यांना एक सुट्टी घेण्याची मुभा या कायद्यामुळे झांबियात आहे. या सुटीचं कारण या महिलांना द्यावं लागत नाही.

चीन : चीनमधल्या काही प्रांतांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना एक किंवा दोन जादा सुट्ट्या देण्याचा कायदा आहे. पण या महिलांना या सुट्ट्या घेण्यासाठी अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मेडिकल सर्टिफिकेट आणून द्यावं लागतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 07:14 PM IST

ताज्या बातम्या