Home /News /national /

मी आणि आई! आईचं लहानपणीचं स्वप्न पुन्हा जिवंत केलं, अन् मी जिंकले!

मी आणि आई! आईचं लहानपणीचं स्वप्न पुन्हा जिवंत केलं, अन् मी जिंकले!

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

काहीही शिकण्यासाठी वय कधीच आड येत नसतं, आड येतं ते आपला विचार आणि वृत्ती. तुम्हीही तुमच्या आईच्या स्वप्नांचा शोध घ्या.

    लहानपणी प्रत्येकाचं काही तरी स्वप्न असतं. सर्वांनाच ते पूर्ण करणं शक्य होत नाही. याचा अर्थ माणूस स्वप्न पाहायचं थांबवतो असं नाही. त्याच्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कायम ते स्वप्न जिवंत असतं. माझं नाव माधुरी देशपांडे (नाव बदललं आहे). माझ्या आईचं असंच एक स्वप्न पूर्ण करण्याचा मी निर्णय घेतला. आईला जरी यात यश मिळालं असलं तरी खऱ्या अर्थाने यात मी जिंकले. (Mothers Day 2022) गाणं हा आईच्या जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी तिला गाणं शिकायचं होतं. मात्र खूप लवकर लग्न झाल्याने तिला तिचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. यानंतर घर, संसार, मुलं यात ती इतकी गुरफटली की वय कधी निघून गेलं तिचं तिलाच कळालं नाही. आई कधी तरी गुणगुणायची. आईचा आवाज गोड आहे. तिला शिकायला मिळालं असतं, तर तिने नक्कीच संगीतात करिअर केलं असतं. त्यामुळे आईला मी वारंवार गाणं शिकायला सांगत होते. पण मुलांचं शिक्षण होऊ देत असं म्हणून ती तिचं स्वप्न पुढे ढकलत होती. यानंतर मुलांचं लग्न आलं...शेवटी मात्र मीच आईला गाण्याच्या क्लासला घेऊन गेले. घरापासून काही अंतरावरच गाण्याचा क्लास होता. इथं तिला प्रवेश घेऊन दिला. आणि एका मोठ्या तपानंतर आई आपल्या स्वप्नांचा पाठलाग करू लागली. गेली 5 वर्षे आई गाणं शिकतेय. यादरम्यान तिने अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. अनेक ठिकाणी गाणं गायलं. मुलांची लग्न झाल्यानंतर मालिकांमध्ये अडकून राहण्यापेक्षा ती आज संगीत जगतेय. तिला गायला खूप आवडतं. यासाठी तीन नियमित रियाजही करते. अर्थात मी कायम तिच्या पाठिशी असते. अगदी प्रत्येक वेळी तिला प्रोत्साहन देते. सुदैवाने इतर महिलांसारखं या वयात शिकून काय होणार, असा विचार ती करीत नाही. खऱ्या अर्थाने ती स्वत:साठी जगतेय. आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप आनंद होते. अखेर आईला तिचं स्वप्न गवसलं. काहीही शिकण्यासाठी वय कधीच आड येत नसतं, आड येतं ते आपला विचार आणि वृत्ती. तुम्हीही तुमच्या आईच्या स्वप्नांचा शोध घ्या. कधी तरी तिलाही विचारा, की आई तुझं स्वप्न काय होतं गं? कदाचित पहिल्या टप्प्यात ती नाही सांगणार. पण तिचं स्वप्न काही अंशी पूर्ण केलं तरी तुमच्या जिवनाचं सार्थक होईल असं वाटतं मला...बघा प्रयत्न करून. (यंदाच्या मदर्स डे निमित्ताने News 18 लोकमतने एक वेगळाच प्रयत्न केला आहे. आतापर्यंत आपण मदर्स डेच्या दिवशी आईमुळे आपल्या आयुष्यात काय काय बदल झाले. तिने कष्ट केलं, ती आमच्यासाठी झिजली, तिने फक्त मुलांचा आणि घराचा विचार केला म्हणून आम्ही उभे राहिलो वगैर वगैर मनोगतं सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र यंदा मदर्स डेच्या निमित्ताने आईसाठी आपण काय करायला हवं, तिचं आयुष्य सुखकर होण्यासाठी स्वत:मध्ये काय बदल करण्याची गरज आहे हे काही जणांच्या अनुभवातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.)
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mother

    पुढील बातम्या