मोठी बातमी! MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन
कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई, 03 डिसेंबर : MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
केवळ पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांनी बड्या उद्योगपतींना मागे टाकत 2017 मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता. 'एमडीएच'ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे 15 कारखाने असून 1000 डिलर्सचं जाळं आहे. महाशय धर्मपाल गुलाटींना त्यांच्या मसाले उद्योग क्षेत्रातील यशासाठी त्यांना 2019 मध्ये 'पद्म भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार धर्मपाल गुलाटी यांना प्रदान करण्यात आला होता.
महाशय धर्मपाल गुलाटी MDH चे मालक होते. अनेकदा त्यांचे फोटो आपण MDHच्या मसाल्यांचा पाकिटावरही पाहिले असतील. त्यांच्या वडिलांनी सध्याचं पाकिस्तान पण त्या काळात असलेलं सियालकोट इथे 1919 साली पहिल्यांदा मसाल्यांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटुंबीय दिलील आले.
सुरुवातील त्यांनी कुटुंब चालवण्यासाठी टांगाचालक म्हणून देखील काम केलं होतं. थोडे पैसे जमल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी लाकडाच्या लहान पेटीतून मसाले विकण्यास सुरुवात केली आणि हा व्यवसाय पुढे वाढवत नेला. आजमितील MDH मसाले भारतात सर्वात प्रसिद्ध आणि त्यातही लाल तिखट आणि काश्मीरी तिखट देखील खूप प्रसिद्ध आहेत.