नवी दिल्ली, 14 मार्च: 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मुद्दयावरुन भारतातील राजकारण तापले आहे. देशातील राजकारणात चीनने संयुक्त राष्ट्र संघात घातलेल्या खोड्यावरुन आता सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात जुंपली आहे.
'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या मार्गात चीननं पुन्हा एकदा खोडा घातल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना घाबरले. संयुक्त राष्ट्र संघात चीनने भारतविरोधी भूमिका घेऊनही मोदी एक शब्द उच्चारू शकले नाहीत', अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधींच्या या ट्विटला भाजपने देखील चोख उत्तर दिले आहे. 'चीन आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य नसता जर तुमच्या आजोबांनी त्यांनी ती जागा भेट म्हणून दिली नसती तर', अशा शब्दात भाजपने राहुल गांधीना उत्तर दिले आहे. त्याच बरोबर भाजपने असे देखील म्हटले आहे की तुमच्या कुटुंबाद्वारे करण्यात आलेल्या चूकांची किमत देश मोजत आहे. भारत दहशतवादाविरुद्धची लढाई नक्की जिंकणार त्याची जबाबदारी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोडून द्या. तोपर्यंत तुम्ही चीनच्या राजकीय अधिकाऱ्यांना लपून-छपून भेटत रहा, असा सल्ला भाजपने राहुल गांधींना दिला आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी
'पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना घाबरले. संयुक्त राष्ट्र संघात चीनने भारतविरोधी भूमिका घेऊनही मोदी एक शब्द उच्चारू शकले नाहीत', अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी ट्विटवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये क्षी जिनपिंग यांच्यासोबत झोपाळ्यावर झोके घेतात, दिल्लीत जिनपिंग यांची गळाभेट घेतात, चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकतात', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
VIDEO: असं काय म्हणाले शरद पवार? ज्यामुळे पार्थनं घेतला काढता पाय