महेश तिवारी, रायपूर, 22 एप्रिल : दंडकारण्यामध्ये माओवाद्यांच्या (Action on Maoists) विरोधात मोठ्या कारवाईची तयारी सुरू असतानाच आज छत्तीसगड पोलिसांवर (Chhattisgarh Police) गेल्या दोन दिवसांपूर्वी ड्रोनच्या माध्यमातून दोन गावांलगत बॉम्ब फेकून हवाई हल्ले केल्याचा गंभीर आरोप माओवाद्यांनी केला आहे. पोलिसांनी मात्र माओवाद्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांसह सर्व यंत्रणा सध्या कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असताना माओवाद्यांकडून मात्र कट रचले जात आहेत.
माओवाद्यांच्या या गंभीर आरोपानंतर भविष्यात दंडकारण्यात (Dandakaranya) ड्रोन किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई हल्ले झाल्यास सुरक्षा दलांच्या नव्या रणनीतीचा माओवादी कसा मुकाबला करतील, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीने आज बस्तर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी हवाई हल्ले केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रवक्ता विकल्पने आज यासंदर्भात बस्तर पोलिसांवर आरोप केला आहे.
हे वाचा - अमरावती जिल्हा शल्यचिकित्सकांसह स्टाफमधील 25 जण कोरोनाबाधित, बहुतेकांनी घेतली होती लस
दोन दिवसांपूर्वी विजापूर जिल्ह्यात पामेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बुत्तालंका आणि पाले गुंडम या दोन गावालगत ड्रोन आणि हेलिकॉप्टर उडत असल्याचे त्या भागात फिरणाऱ्या माओवाद्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर माओवाद्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काही वेळातच त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून बारा बाँब फेकण्यात आले, मात्र, काही वेळापूर्वीच माओवादी तिथून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे माओवाद्यांचे नुकसान झाले नाही. मात्र, हे बॉम्ब फेकण्यात आल्यामुळे त्या भागातील काही झाडे-झुडपे, जंगल, वन्यप्राणी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा गंभीर आरोप विकल्पने केला आहे.
हे वाचा - ‘केंद्र सरकारची सारवासारवी’, लॉकडाऊन टाळा या मोदींच्या सल्ल्यानंतर शिवसेनेचा हल्लाबोल
यासंदर्भात ज्या भागाचे नुकसान झाले आहे, तेथील काही फोटो आणि व्हिडीओही विकल्पने काही प्रसारमाध्यमांना पाठवले आहेत. दरम्यान, बस्तरचे पोलीस आयजी सुंदरराज यानी माओवाद्यांचा हवाई हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Naxal Attack, Police action