महेश तिवारी
गडचिरोली, 15 जून : गडचिरोली जिल्हयाला लागून असलेल्या छत्तीसगडच्या कांकेरमध्ये काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले होते. या चकमकीनंतर घटनास्थळी सापडलेल्या शस्त्रसाठ्यात पाकिस्तानी लष्करात वापरली जाणारी G-3 ही अमेरिकन बनावटीची बंदूक सापडली आहे. माओवाद्यांकडे पाकिस्तानी लष्कराच्या वापरातलं शस्ञं सापडलं आहे. त्यामुळे माओवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून शस्ञपुरवठा होतो आहे का या दिशेने सुरक्षा दलांनी चौकशी सुरू केली आहे.
छत्तीसगडमध्ये चकमक
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात मुरनारच्या जंगलात शुक्रवारी सकाळी एक चकमक झाली. त्या चकमकीत दोन माओवाद्याना पोलिसांनी ठार केलं होतं. हे दोघं जहाल माओवादी होते. त्यांना जिथे ठार करण्यात आलं त्याठिकाणी काही बंदुका सापडल्या. त्यामध्ये G-३ ही अमेरिकन बनावटीची बंदूक सापडली. या बंदुका पाकिस्तानी लष्करात वापरल्या जातात. अशाच पद्धतीची शस्त्रं गेल्या वर्षी बस्तरच्या सुकमा जिल्ह्यात सापडली होती. आता पुन्हा एकदा अशा बंदुका सापडल्यामुळे माओवाद्यांकडे ही शस्त्रं कुठून आली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
VIDEO : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं विखे झाले नाराज, म्हणाले...
सुरक्षा यंत्रणांचा तपास
माओवाद्यांना अशा पद्धतीची ही शस्त्रं नेमकं कोण पुरवतं ? एखाद्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या गटाशी माओवाद्यांचा संपर्क आला आहे का किंवा माओवाद्यांना आयएसआय या गुप्तहेर संघटनेकडून शस्त्रांस्त्रांचा पुरवठा होत आहे का या दृष्टीने आता तपास सुरू आहे.
G-3 ही रायफल पाकिस्तानी लष्कर मोठ्या प्रमाणात वापरते. पाकिस्तानमध्ये या अमेरीकन बनावटीच्या शस्ञांच्या निर्मितीचा कारखानाही आहे. तिथून अशा पद्धतीची शस्त्रं दंडकारण्यात माओवाद्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहेत का यावर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष केंद्रित केलं आहे.
माओवाद्यांविरोधात मोहीम
यावर्षीच्या महाराष्ट्र दिनी माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 15 जवान शहीद झाले होते. त्यानंतर गडचिरोलीमध्ये माओवाद्यांविरोधातली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
============================================================================================
SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'अॅडवॉर'