पणजी, 17 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची तब्येत अधिकच खालावल्याने गोव्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. गोव्यातील भाजप सरकार बरखास्त करून आम्हाला सरकार स्थापनेची संधी द्यावी, अशी विनंती काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे केली आहे. तसं पत्रही त्यांनी राज्यपाल कार्यालयाकडे पाठवले आहे.
दुसरीकडे भाजपने आपले सरकार अधिक मजबूत करण्यासाठी मंत्री आणि आमदारांच्या बैठकीचे सत्र सुरू केलं आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक भाजप कार्यालयात होणार आहे. त्यात भाजप आमदार, दोन्ही खासदार, अध्यक्ष आणि भाजपचे कोअर कमिटी सदस्य सहभागी होतील . तर काँग्रेस आमदार राज्यपालांना भेटण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
गोव्यात सध्याच्या स्थितीत सरकार कायम ठेवून जे पर्याय समोर येत आहेत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
-भाजप आणि घटक पक्ष यांना एकत्र ठेवणे
-घटक पक्षांना विचारात घेऊन पर्रिकरांना पर्याय शोधणे
-पर्रिकर यांना कायम ठेवून नवा उपमुख्यमंत्री नेमणे
-नेतृत्व बद्दल न करता घटक पक्षांना घेऊन कमिटी करून सरकार कायम करणे
-परिस्थिती हाताळण्यासाठी विधानसभा स्थगित करणे
-राष्ट्रपती राजवट लागू करणे
-विधानसभा बरखास्त करून नव्याने निवडणुकांना सामोरे जाणे
दरम्यान, भाजपपुढे असे अनेक पर्याय असले तरी पर्रिकरांना हवा असा पर्याय अद्यापदेखील समोर आलेला नाही. सध्या भाजपचे 5 मंत्री आहेत त्यापैकी मिलिंद नाईक , निलेश काब्राल हे अगदीच नवे आहेत. तर माविन गुदिन्हो , विश्वजित राणे काँग्रेस मधून भाजपात आले आहेत आणि पर्रीकर यांची तब्येत चिंताजनक आहे. शिवाय नवा पर्याय घटक पक्षांना मान्य हवा. त्यामुळे एकूणच भाजप समोर अनेक अडचणी आहेत
अशातच लोकसभा आणि गोव्यातल्या 3 रिक्त जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्यावर कोणताच परिणाम होवू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, कांग्रेसला भाजप विधानसभा बरखास्त करण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांचे अनेक आमदार भाजपात येण्यासाठी उत्सुक आहेत. पक्षांतर करू पण निवडणूक नको अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे गोव्यात सत्तेबाबत मोठा पेच तयार झाला असल्याचं चित्र आहे.
VIDEO : औरंगाबादेत पोहोचल्यानंतर अर्जुन खोतकर म्हणतात...