#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी

#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी

#MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात पुढे येऊन बोलत आहेत, त्या सर्वांवर माझा विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी लवकरच एक ४ सदस्यीय न्यायिक समिती गठित करण्यात येणार आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर :  #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात पुढे येऊन बोलत आहेत. या सगळ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी लवकरच एक न्यायिक समिती गठित करण्यात येणार आहे.

महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून #MeToo या हॅशटॅगसह अनेक महिलांनी आपलं लैंगिक शोषण किंवा छळ कसा झाला याविषयी पुढे येऊन सांगितलं आहे. या सगळ्या तक्रारींवर आपला विश्वास आहे आणि यावर सुनावणी झालीच पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं मनेका गांधी म्हणाल्या.

या संदर्भात जनसुनवाई करण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ, न्यायमूर्ती यांची 4 सदस्यीय समिती नेमण्याची शिफारस मंत्रालयाने केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात आज ट्वीट करून आपली भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियावरच्या या मोहिमेला पाठिंबा देताना राहुल गांधी यांनी लिहिलंय की, सत्य बाहेर आलंच पाहिजे. ते खड्या आवाजात स्पष्टपणे मांडायलाच हवं. स्त्रियांना आदरपूर्वक आणि प्रतिष्ठेची वागणूक मिळायलाच हवी, असंही त्यांनी ट्विटरवर लिहिलंय.

दरम्यान #MeToo मोहिमेत आज आणखी काही चित्रपट क्षेत्रातल्या पुरुषांविरोधात महिलांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामध्ये चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई याचं नावही आलं आहे. आमीर खान आणि अक्षय कुमार यांनी स्त्रियांची छळवणूक करणाऱ्या चित्रकर्त्यांबरोबर किंवा सहकलाकारांबरोबर काम न करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

अक्षय कुमारनं हाऊसफुल 4 या चित्रपटाचं शूटिंग रद्द केलंय. साजिद खान या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर आरोप झाल्यानंतर अक्षयनं हा निर्णय ट्विटरवरून जाहीर केला.

'मी टू' वादळात बॉलिवूडचे 'शो मॅन' अशी ओळख असलेले दिग्दर्शक सुभाष घई यांचंही नाव आले आहे. घई यांच्या कंपनीतील एका माजी कर्मचारी महिलेने घई यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. घई यांनी ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळून ते मला पाजले आणि नंतर मी नशेत असताना हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केलाय.

या महिलेने आपले नाव गुप्त ठेवले असून तिची व्यथा लेखिका महिमा कुकरेजाने एका पोस्टच्या माध्यमातून ट्विटरवर मांडली आहे.

महिमा कुकरेजा यांनी सांगितलंय की, 'पीडित महिला ही मीडियामध्ये मोठ्या पदावर काम करते, तिला आपले नाव गुप्त ठेवायचे आहे.'

First published: October 12, 2018, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading