नवी दिल्ली18 डिसेंबर: कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या आणि वाईट बातम्यांचा अक्षरशः पाऊसच पडतो आहे. कधी रिपोर्ट (Report) चुकीचे आले म्हणून, तर कधी एकाचे रिपोर्ट दुसऱ्याला दिले गेले म्हणून आरटीपीसीआर (RT-PCR) आणि अँटिजेन टेस्ट (Antigen Test) रिपोर्टचा घोळ झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. पतियाळातल्या (Patiala) सोनिया नावाच्या एका महिलेला मात्र या बाबतीतला एक भयंकर अनुभव आला आहे. तब्बल महिनाभरानंतर तिच्या पतीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह (Corona Negative) असल्याचा SMS त्यांना आला. हा एसएमएस सुखद आहे, असं वाटत असेल, तर पुढची गोष्ट ऐका. तिच्या पतीचं कोरोनामुळे निधन होऊन एक महिना होऊन गेल्यानंतर हा एसएमएस तिला मिळाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोरोनामुळे गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे पतियाळातल्या सलीम खान यांचा 31 ऑक्टोबरला अंबालाच्या मिशन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सलीम यांची पत्नी सोनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान एका खासगी फॅक्टरीत कामाला होते. ऑक्टोबर महिन्यात त्यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली.
14 ऑक्टोबर रोजी त्यांचे स्वॅब (Swab) घेऊन तपासणीला (Test) पाठवण्यात आले. सुरुवातीला राजपुरा सरकारी हॉस्पिटलमध्ये, तर नंतर अंबालातल्या मिशन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा आघात झाला; मात्र याहूनही अधिक आघात त्यांच्यावर व्हायचा होता.
COVID-19 नंतर आणखी एका आजाराचं थैमान! अहमदाबादमध्ये 9 जणांचा मृत्यू
दोन डिसेंबर रोजी पती सलीम यांच्या फोनवर एक एसएमएस आला आणि तो वाचून त्यांना धक्काच बसला. ‘दोन डिसेंबर 2020 रोजी 10.14 वाजता सलीम खान यांचं रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी सॅम्पल स्वीकारण्यात आलं असून, त्यांनी रिपोर्ट मिळेपर्यंत स्वतःला विलगीकरणात ठेवावं,’ असं त्यात म्हटलं होतं. सॅम्पलचा नंबरही त्यात देण्यात आला होता. हा एसएमएस ‘myGOV’कडून आला होता. पतियाळा लॅबोरेटरीत सॅम्पल घेतल्याचंही त्यात म्हटलं होतं.
एवढ्यावरच ही गोष्ट संपली नाही. सहा तासांनी त्यांना ‘PBGOVT’ या नावाने आणखी एक एसएमएस आला. त्यात लिहिल्यानुसार, सलीम खान यांचा रॅपिड अँटिजेन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
या प्रकारामुळे कुटुंबीय व्यथित झाले आहेत आणि हे का झालं असावं, त्याचा शोध घेत आहेत. अंबाला ग्रामपंचायतीतून त्यांनी सलीम यांचं डेथ सर्टिफिकेटही घेतलं आहे.
सोनिया यांनी ते मेसेजेस नातेवाईकांना पाठवले. त्या मेसेजेसचा अधिक अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, की त्यात पेशंटचं गाव कालो माजरा निमतपूर असं लिहिण्यात आलं होतं. प्रत्यक्षात कालो माजरा (Kalo Majra) आणि निमतपूर (Nimatpur) ही दोन जवळजवळची, पण वेगवेगळी गावं असून, सलीम यांचं गाव निमतपूर हे आहे.
कालो माजरा गावातलं आरोग्य केंद्र 100 गावांसाठी आहे. एक्स्प्रेसच्या बातमीत म्हटल्यानुसार, असे रिपोर्ट अनेकांना पाठवले जात आहेत. एखाद्याने टेस्टसाठी स्वॅब पाठवले आहेत की नाहीत, हे न पाहताच अनेक जणांना एसएमएस पाठवले जात आहेत. कोविड (Covid 19) रुग्णांचे आकडे वाढण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे.
COVID-19 रुग्णांच्या संख्येत घट कायम, मात्र धोका टळलेला नाही
गेल्या काही महिन्यांत खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या आरटी-पीसीआर चाचण्यांमध्येही अनेक घोळ असल्याचं दिसून आलं आहे. अलीकडेच केरळमधल्या एका खासगी प्रयोगशाळेने मध्य-पूर्वेतून आणि अन्य देशांतून आलेल्या अनेकांना चाचण्या न घेताच निगेटिव्ह रिपोर्ट दिल्याचे प्रकरण उघड झाले होते. मंगळवारी पोलिसांनी या प्रकरणी त्या प्रयोगशाळेच्या मॅनेजरला अटक केली.
मिरत जिल्ह्यातल्या एका खासगी हॉस्पिटलचा परवानाही अलीकडेच रद्द करण्यात आला होता. पैशांसाठी तिथले कर्मचारी कोरोनाचे खोटे रिपोर्ट देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.