कोलकाता, 4 जानेवारी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं संसदेतलं, राजकीय सभांमधलं आक्रमक रूप आतापर्यंत सगळ्यांना परिचित होतं. राजकारणातल्या खिलाडूपणाबद्दलही नेहमी बोललं जातं, पण प्रत्यक्ष कोर्टवरचा त्यांचा खेळ कोणी कधी पाहिला नसेल.
ममता बॅनर्जीं त्यांच्या नेहमीच्या शुभ्र पांढऱ्या साडीत, वर शाल घेऊन बॅडमिंटन कोर्टवर अवतरल्या आणि त्यांनी चार चांगले शॉट्सही मारले.
एका गावात कुठल्याशा कार्यक्रमासाठी गेलेल्या असताना ममता बॅनर्जींनी बॅडमिंटन खेळण्यासाठी अशी थोडी फुरसत मिळालेली असावी.
बंगाली मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअरसुद्धा झालाय. स्वतः ममता बॅनर्जींनीच तो टाकला आहे. ममता बॅनर्जींचं नाव देशाच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आहे ते तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू झाल्यामुळे. तिसऱ्या आघाडीचं सरकार आलंच तर ममतांचं नाव नेतेपदीसुद्धा येऊ शकतं, अशी चर्चा त्यांचे समर्थक करत असतात. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नसल्याचे संकेत दिले आहेतच. कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ. तेव्हाच पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेऊ, असं त्या नुकत्याच म्हणाल्याचं वृत्त आहे.