कोलकाता, 8 ऑक्टोबर : कोविड-19 ने 2020 या वर्षातले सहा महिने आपलं आयुष्य व्यापलं आहे आणि आपल्याला जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी कोरोनाचा विषाणू भासतो आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही तीच अवस्था आहे. जगभरातील संशोधकांच्या जोडीने आता ममतादीदींनीही एक तर्क मांडला आहे. ‘ट्रकचे टायर सगळीकडे प्रवास करतात त्यामुळे त्या टायरच्या माध्यमातून कोविड-19 विषाणूचा प्रसार होत आहे. त्यामुळे ट्रक वाहतूक बंद केली तर कोरोनावर नियंत्रण आणता येईल,’ असं मत ममतादीदींनी झारग्राम जिल्ह्याच्या प्रशासकीय बैठकीत माडंल्याचं वृत्त हिंदूस्थान टाइम्सनी दिलं आहे.
दीदींनी झारग्राममध्ये प्रशासकीय बैठक घेतली त्यात त्या म्हणाल्या, ‘ माझ्या घराजवळ एकाच घरातल्या 6 जाणांना कोरोनाची लागण झाली. ती साथ 36 जणांपर्यंत पोहोचली. गाड्यांच्या टायरमधून विषाणूंचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे मी त्या घराजवळ जाणारी वाहतूक थांबवली. कोरोनाचं प्रमाण कमी झालं पण 8 सप्टेंबरला वाहतूक पुन्हा सुरू झाल्यावर परत कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं. त्यामुळे बहुधा शेजारच्या झारखंडमधून येणाऱ्या ट्रकच्या टायरच्या माध्यमातून कोरोना विषाणू आपल्या राज्यात येत असतील. त्यामुळे टोल प्लाझावर ट्रकच्या टायरचीही तपासणी करा.’ झारग्राम हा पश्चिम बंगालमधला भाग झारखंडच्या सीमेला लागून आहे. झारखंडमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना काळजी वाटणं रास्त आहे. यासंदर्भातलं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. ममतादीदींनी टायर तपासायचा आदेशच दिल्यामुळे पोलीस आता टायरही तपासतील.
ममता बॅनर्जी असंही म्हणाल्या की, हवेत पसरलेल्या विषाणूमुळे कोरोनाची लागण होऊ शकते. तोच तर्क त्यांनी ट्रक टायर्सच्या बाबतीत लावला. त्यांच्या या दाव्यात अजिबात तथ्य नाही, असं नाही.
विज्ञान काय सांगतं ?
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने (CDC) कोरोना विषाणू हवेतून पसरू सकतात असं निरीक्षण जाहीर केल्यानंतरच ममता बॅनर्जींनी हे वक्तव्य केलं आहे. ट्रकचं टायर हे सिंथेटिक रबरापासून तयार करतात ते कठीण असतं अशा कठीण पृष्ठभागावर कोविड विषाणू पटकन रेप्लिकेट करू शकत नाही. संशोधकांच्या मतानुसार कठीण पृष्ठभागावर जरी कोविड विषाणू जिवंत राहत असला तरीही तो जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. WHO च्या म्हणण्यानुसार कोविडचा विषाणू प्लॅस्टिक, स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर 3 दिवस तर तांब्यावर 4 तास आणि कार्डबोर्डवर 1 दिवस जिवंत राहू शकतो. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन आणि द लँसेट यांनी केलेल्या अभ्यासानुसार कोविडचा विषाणू प्लॅस्टिक, स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर 3 ते 7 दिवस तर कार्डबोर्डवर 1 दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ममतादीदींचा तर्क पूर्णपणे चुकीचा आहे. वाहनांतून माणसांची ने-आण झाल्याने त्यांच्या परस्पर संपर्कातून कोरोनाचा विषाणू पसरू शकतो हे सत्य जगाला माहीतच आहे. त्या कारणासाठी वाहतूक थांबवणं योग्य असू शकतं, पण टायरचं तर्कट निराधार आहे.