दिल्लीत जोरदार हालचाली, महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार!

दिल्लीत जोरदार हालचाली, महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार!

काँग्रेसकडून निर्णय आल्यानंतरच राष्ट्रवादी निर्णय घेईल. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर काहीच वेळ लागणार नाही. मात्र असे निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागतो.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेची कोंडी कायम असली तरी ती फोडण्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तोडगा निघू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. राज्यात शिवसेनेसोबत किमान समान कार्यक्रमावर जी चर्चा झाली त्यावर उद्या त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी पाच ते सहा मुद्यांवर चर्चा होणार आहे. नवं सरकार पाच वर्ष सरकार टिकले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची. लोकसभेत सोबत राहायचं का? विधानसभा अध्यक्षपदाबाबत काय करायचं, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न इत्यादी प्रश्नांवर उद्याच्या बैठकीत निर्णय होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी 5 वाजता ही बैठक होणार आहे.

काँग्रेसकडून निर्णय आल्यानंतरच राष्ट्रवादी निर्णय घेईल. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर काहीच वेळ लागणार नाही. मात्र असे निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलीय.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता, उद्धव ठाकरे करणार आमदारांशी चर्चा

राऊत पवारांच्या भेटीला

महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेची कोंडी फोडण्यासाठी आता शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती पुढे आलीय. आज होणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची बैठक आता बुधवारी नवी दिल्लीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊतांचं पवारांना भेटणं हे महत्वाचं मानलं जातंय. राऊतांनी सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेऊन चर्चा केलीय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह काही नेते हे दिल्लीत दाखल झाले असून ते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत येण्यास सांगितलं असून शुक्रवारी उद्धव ठाकरे सर्व आमदारांशी बोलणार आहेत.

शिवसेनेबद्दल सोनियांना हवी 'ही' गॅरेंटी; शरद पवारही पडले गोंधळात?

राज्यात सत्तास्थापनेसाठी विलंब होत असल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. फक्त आमदारच नाही तर कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेसची चर्चा सुरू केली. या जुळवाजुळवीलाही आता अनेक दिवस होत असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न आता सेनेतूनच विचारला जातोय. दररोज फक्त बैठका होत असल्याने त्यातून काहीही निघत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर हाता तोंडाशी आलेला घास जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करणार आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 19, 2019, 8:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या