शिवसेनेची अस्वस्थता वाढली; मात्र काँग्रेसच्या बैठका सुरूच, आजही सोनियांची खलबतं

शिवसेनेची अस्वस्थता वाढली; मात्र काँग्रेसच्या बैठका सुरूच, आजही सोनियांची खलबतं

काँग्रेसचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेचं टेंन्शन वाढलं आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सगळ्यांचं लक्ष लागलंय ते काँग्रेसच्या भूमिकेवर. मात्र काँग्रेसच्या नुसत्या बैठकाच सुरू आहेत. आजही दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींच्या घरी चर्चा केली. या बैठकीला अहमद पटेल, ए. के. अँटनी आणि के. सी. वेणुगोपाल हे नेते उपस्थित होते. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, दिला तर कसा द्यायचा, सत्तेत सहभागी व्हायची की बाहेरून पाठिंबा द्यायचा असे अनेक प्रश्न काँग्रेससमोर असून शिवसेनेसोबत जाण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेनेला आता काँग्रेसच्या प्रतिसादाची प्रतिक्षा आहे. तर काँग्रेसचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोनही पक्षांची पत्रं मिळालेली नाहीत. त्यामुळे शिवसेनेचं टेंशन वाढलं आहे.

शिवसेनेबद्दल सोनियांना हवी 'ही' गॅरेंटी; शरद पवारही पडले गोंधळात?

राज्यात सत्तास्थापनेसाठी विलंब होत असल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. फक्त आमदारच नाही तर कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेसची चर्चा सुरू केली. या जुळवाजुळवीलाही आता अनेक दिवस होत असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न आता सेनेतूनच विचारला जातोय. दररोज फक्त बैठका होत असल्याने त्यातून काहीही निघत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर हाता तोंडाशी आलेला घास जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करणार आहेत.

शुक्रवारी सर्व आमदारांना मातोश्रीवर बोलविण्यात आलं असून या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना वस्तुस्थिती सांगणार आहेत. या बैठकीत ते कुठला संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.

थोरातांसमोर 'धर्म'संकट! मतदारसंघातूनच काँग्रेसच्या भूमिकेला विरोध

शिवसेना करणार 'प्लान बी'

शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यातील बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा संभ्रम दूर होईल, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सत्तास्थापनेबाबत तुम्ही भाजप आणि शिवसेनेला विचारा, असं म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर शिवसेनाही गोंधळात पडली आहे. यातूनच शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.

'शिवसेनेनं आता राष्ट्रवादीसोबत चर्चा करणं थांबवून पुन्हा भाजपसोबत चर्चा करावी,' असा मतप्रवाह शिवसेनेत तयार होत आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने पक्षाकडे अशी मागणी केली आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाईम्स' या दैनिकाने वृत्त दिलं आहे. त्यामुळे शिवसेना खरंच पुन्हा यू-टर्न घेत सत्तास्थापनेसाठी भाजपच्या पर्यायाचा विचार कऱणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 19, 2019, 5:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading