मुंबई, 25 जून : शिवसेना आमदारांनी (Shivsena MLA) वेगळा गट स्थापन करत महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला आहे. विधान परिषदेची निवडणूक संपल्यानंतर काही तासांमध्येच आमदारांनी अचानक सुरत गाठल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. सध्या गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेल्या या आमदारांनी स्वत:चे सुरक्षा अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे गुंगारा दिला याची माहिती आता समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे.
या पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'राज्य पोलिसांनी सुरक्षा दिलेल्या अनेक आमदारांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना वैयक्तिक काम असल्याचं सांगून ते परत येण्याची वाट पाहण्याची सूचना केली. त्यानंतर ते आमदार काहीही न सांगता सुरतला निघून गेले. मुंबईतील एक आमदार त्यांच्या कार्यालयात बसून नारळ पाणी पित होते. आपण काही मिनिटांमध्येच येऊ असं त्यांनी समर्थकांना सांगितलं आणि ते तिथून निघून गेले. अन्य एका शिवसेना आमदारांनी आपण घरी जात असल्याचं कारण दिलं. युवा सेनेचा पदाधिकारी त्यावेळी कारमध्ये त्यांच्यासोबत प्रवास करत होता. पण, थोड्यावेळानी त्यांनी या अधिकाऱ्याला कारमधून उतरवले आणि ते पुढे निघून गेले.'
हॉटेलच्या मागच्या गेटमधून पलायन
या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, 'आणखी एका आमदारानं त्यांच्या सुरक्षा रक्षकांना हॉटेलमध्ये आपलं काम आहे, तुम्ही बाहेर जा असं सांगितलं. गार्ड दूर गेल्यानंतर ते मागच्या दरवाज्यातून बाहेर पडले.' आमदार परत न आल्यानं सुरक्षा अधिकाऱ्यानं वरिष्ठांना सूचना दिली होती का असा प्रश्न विचारल्यावर काही आमदारांच्या बाबतीमध्ये ही सूचना मिळाली अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.
चार आमदारांची सुरक्षा एसपीओ (विशेष पोलीस अधिकारी) आणि सुरक्षा अधिकऱ्यांकडं होती. पण, त्यांना आमदारांच्या योजनांची माहिती नव्हती. या आमदारांनी वैयक्तिक कार्यक्रमाचा खुलासा केला नव्हता. एसपीओने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देईपर्यंत या आमदारांनी राज्याची सीमा ओलांडली होती. काही तासांमध्येच हे सर्व नाट्य घडले. त्यांच्या सुरक्षेत तैनात अधिकाऱ्यांना याची कोणतीही माहिती नव्हती.'
एकनाथ शिंदे यांच्या गावाचा Ground Report, शाळा, हॉस्पिटल नाहीत पण 2 हेलिपॅड सज्ज
'कारवाई नाही'
हे संपूर्ण प्रकरण गुप्तचर विभागाचे अपयश असल्याचा आरोप गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. शिवसेना आमदार विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संपर्कात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मागील वर्षभरापासून होती. पण, याबाबत कागदोपत्री कोणतीही नोंद नव्हती. संबंधित व्यक्तींना फक्त तोंडी सांगण्यात आले होते. या सूचनेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त होतं. शिवसेना आमदार सुरतला निघून गेल्याबाबत राज्यातील गृहमंत्रालय आणि गुप्तचर विभागाने सतर्क का केलं नाही? असा प्रश्न पवारांनी विचारला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.