प्रफुल साळुंखे, मुंबई 7 जून : सरकारी कार्यालयात गेल्यावर कामे होत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार असते. त्यामुळे 'सरकारी' काम असं उपहासाने म्हटलं जातं. कर्मचाऱ्यांच्या या कार्यपद्धतीमुळे लोकांची कामे तातडीने होत नाहीत. विविध कामांसाठी राज्यातून लोक मंत्रालयात येतात त्यावेळी तिथेही त्यांना तोच अनुभव येतो. आता बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सरकारने खास आदेशच काढले आहेत. जेवणाची वेळ ही फक्त अर्ध्या तासांची असून सर्वांनी एकाच वेळी जेवायला जावू नये याची काळजी घ्यावी असे या आदेशात म्हटले आहे.
मंत्रालयात गेल्यावर कामे होत नाहीत अशा तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान मंत्रालयात सर्वच विभागात कामकाज थंडावते. ही जेवणाची वेळ आहे असं सांगत लोकांना वाट बघायला सांगितले जाते. नंतरही कर्मचारी अडीच वाजेपर्यंत काम करायला सुरुवात करतात अशा तक्रारी आल्याने सरकारने आता कर्मचाऱ्यांना आठवण करुन दिली आहे.
सर्वांना सोईचं व्हावं म्हणून दुपारी 1 ते 2 ही जेवणाची वेळ ठरविण्यात आली होती. त्यात कर्मचाऱ्याने कुठल्याही अर्ध्या तासात जेवायला जाणं अपेक्षीत होतं. मात्र या काळात सर्व विभागातले सर्वच कर्मचारी जेवणासाठी जातात असं आढळून आलं. त्याचबरोबर या काळात सर्वांनात तिष्टत ठेवलं जातं त्यामुळे लोकांची कामं रखडतात असं या आदेशात म्हटलं आहे.
जेवायला जाताना सर्वांनी एकाच वेळी न जाता आपापल्या विभागात कर्मचाऱ्यांनी नियोजन करून गेलं पाहिजे म्हणजे लोकांची कामे रखडणार नाहीत असं या आदेशात म्हटलं आहे.