नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: राज्यातील सत्ता स्थापनेचा गोंधळ आता कुठे मिटेल असे वाटत असताना त्याला पुन्हा एकदा मोठा ब्रेक बसेल अशी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदावरून भाजप सोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा पर्याय निवडला. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सत्ता वापटासंदर्भात चर्चा सुरु आहे. राज्यातील शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होणार का यासंदर्भात आज (सोमवार) दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक होणार आहे. आज दिल्लीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. पण पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा गोंधळ आणखी वाढणार असेच दिसत आहे.
राज्यातील सरकार स्थापने संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेलाच विचारा असे उत्तर शरद पवारांनी दिले. इतक नव्हे तर सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे का याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, कसली चर्चा, कोणाशी चर्चा. पवारांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Delhi: NCP Chief Sharad Pawar says "There is a meeting today," on being asked about his meeting with Congress Interim President Sonia Gandhi today. https://t.co/XEb5kUiAHv pic.twitter.com/tDeuQ8rnI9
— ANI (@ANI) November 18, 2019
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार अशी चर्चा आहे. असे असताना पवारांनी मात्र असे काही सुरुच नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली आहे. ते वेगळे आहेत आणि आम्ही व काँग्रेस वेगळे आहोत. त्यांनी त्यांचा मार्ग निवडायचा आम्ही आमचे राजकारण करू, असे पवार म्हणाले.
आज पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. ही चर्चा प्रामुख्याने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात असू शकते असे समजते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा