बैतूल ( मध्य प्रदेश) 27 डिसेंबर : देशात श्रद्धेच्या नावाखाली अनेक वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात. यामधील काही प्रथांमुळे भक्तांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या प्रथा बंद करण्यासाठी अनेक सामाजिक आंदोलन वेळवेळी झाली आहेत. तसच सरकारी कायदे देखील करण्यात आले. त्यानंतरही काही प्रथा आजही सुरु आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूलमध्ये श्रद्धेच्या नावाखाली एक त्रासदायक खेळ होतो. विशेष म्हणजे हा खेळ करणारी मंडळी स्वत:ला ‘पांडवांचे वंशज’ (Descendants of the Pandava) म्हणतात. ‘आज तक’ नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील रज्जड समाजाची मंडळी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात सेहरा या गावात एकत्र येतात. ही मंडळी स्वत:ला पांडवांचे वंशज समजतात. ‘पांडवांनी काट्याच्या झाडाला टांगून एक परीक्षा दिली होती,’ असा या मंडळींचा दावा आहे. त्यामुळे रज्जड समाज गेल्या कित्येक वर्षांपासून त्या प्रथेचं पालन करत आहे.
‘काट्यांच्या बिछान्यावर झोपत भक्ती आणि सत्याची परीक्षा दिल्यानंतर देव प्रसन्न होतो आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात’, अशी या या समाजाची समजूत आहे.
रज्जड समाज मार्गशीर्ष महिन्यात काट्यांच्या झाडाच्या फांद्यांची विधीवत पूजा करतो. त्यानंतर या समाजातील मंडळी एक-एक करत त्या झाडांच्या फांद्यांनी तयार केलेल्या बिछान्यावर झोपून त्यांच्या भक्तीचं सर्वांसमोर प्रदर्शन करतात.
का पाळली जाते प्रथा?
रज्जड समाजाच्या समजुतीनुसार, ‘पांडव एकदा पाण्याने व्याकूळ होऊन भटकत होते. त्यांना नाहल समाजाची एक व्यक्ती जंगलात भेटली. त्या व्यक्तीला जंगलात तळं कुठं आहे हे माहिती होतं. मात्र,तळाचा पत्ता सांगण्यासाठी पांडवांनी त्यांच्या बहिणीचं लग्न आपल्याशी लावून द्यावं अशी अट त्या व्यक्तीने घातली होती.’
पांडवांना कोणती बहिण नव्हती. त्यामुळे त्यांनी भोंदई नावाच्या एका मुलीला बहिण मानले आणि तिचं लग्न त्या व्यक्तीशी लावले. बहिणीची पाठवणी करताना त्या व्यक्तीनं पांडवांना काट्याच्या झाडांवर झोपून खरेपणाची परीक्षा देण्यास सांगितले. त्यावेळी सर्व पांडवांनी ती परीक्षा दिली.’
500 पिढ्यांची परंपरा
रज्जड समाजही स्वत:ला पांडवांचा वशंज समजत असल्याने तो दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात ही भयंकर परीक्षा देतो. गेल्या पाचशे पिढ्यांपासून ही परंपरा सुरु असल्याचा त्यांचा दावा आहे. पाच दिवस हा उत्सव चालतो.
डॉक्टरांचा इशारा
‘कोणत्याही व्यक्तींनी काट्यांवर झोपणे हे त्याच्या जीवासाठी धोकादायक आहे. त्याचबरोबर त्याला वेगवेगळे आजार ही होऊ शकतात’, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.