भोपाळ, 04 डिसेंबर : कोरोना काळात जिथे माणूस एक दुसऱ्याला मदत करायला तयार नव्हता तिथे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले. रात्रंदिवस उपचार केले आणि नागरिकांची मदत केली अशा कोरोना योद्धांची मागणी आणि म्हणणं दडपून टाकण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धे त्यांची मागणी घेऊन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेण्यासाठी थांबले होते. मात्र त्यांच्या मागण्या आणि म्हणणं न जुमानताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता पोलीस कोरोना योद्ध्यांवर तुफान लाठीचार्ज करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हे वाचा-ओवेसींचा गड असलेल्या हैदराबाद जिंकणं भाजपसाठी का महत्त्वाचे?
कोरोनाच्या भयंकर काळात, जिथे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक एकमेकांपासून पळत होते अशा परिस्थितीत कोरोना वॉरियर्स म्हणजेच आरोग्य कर्मचारी यांनी कोरोनाने संसर्ग झालेल्यांना ओळखून त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी घेतली.
याच कोरोना योद्धा, म्हणजेच आरोग्य कर्मचार्यांच्या विरोधाला चिरडण्यासाठी आज मध्य प्रदेशमधल्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे. कोरोना कर्मचाऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांची दंडेलशाही पाहायला मिळाली. या घटनेनंतर सोशल मीडियावरून संतापाची लाट उसळली आहे.