भोपाळ, 28 जून : गोरक्ष दलाच्या जिल्हाप्रमुखाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरक्ष दलाचे जिल्हाप्रमुख रवी विश्वकर्मा यांच्या हत्येचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. 6 ते 7 जण त्यांच्या कारवर हल्ला करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. याच दरम्यान हल्लेखोरांनी गोळीबारही केला. गोळीबारात रवी विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास रवी विश्वकर्मा आपल्या मित्रांसह जात असताना हल्लेखोरांनी त्यांचा मार्ग रोखला. सुरुवातीला बाचाबाची करत लाठ्या-काठ्यांनी गाडीवर हल्ला केला. त्यानंतर रवी विश्वकर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि पसार झाले. विश्वकर्मा यांना मारण्यासाठी हे कटकारस्थान रचण्यात आलं होतं असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला आहे.
मध्य प्रदेशातील गोरक्षा दलाच्या प्रमुख्याची गोळ्या घालून हत्या. हत्याकांडाचा थरारक व्हिडीओ समोर pic.twitter.com/gScCZ42fMt
ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील होशंगाबाद इथे घडली आहे. होशंगाबादहून पिपरिया इथे जाण्यासाठी निघालेल्या रवी विश्वकर्मा यांची वाट अडवून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पिपरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश अंधवान यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वकर्मा यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेले दोन मित्रही जखमी झाले आहेत. या प्रकरणी 10 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.