इंदौर, 26 जानेवारी : देशभरात आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सूत्रसंचालनाची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा अचानक मृत्यू झाला आहे. अकरावीची विद्यार्थीनी बेशुद्ध झाली आणि रुग्णालयात नेण्याआधी तिचा मृत्यू झाला.
इंदौरच्या सुदामा नगरमधील छत्रपती शिवाजी स्कूलमध्ये ही घटना घडली. वृंदा त्रिपाठी असं मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. वृंदा त्रिपाठी ही वर्गातून बाहेर जात होती. त्यावेळी अचानक खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. तिच्या मैत्रिणींनी याची माहिती शिक्षकांना दिली आणि त्यांनी वृंदाला लगेच जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हेही वाचा : नवरदेव लग्झरी कारसाठी अडून बसला अन् तिथेच फसला, नवरीने केलं असं काही की...
वृंदा बेशुद्ध होऊन पडल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागली असतील. पण तेवढ्या कमी काळात तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी म्हटलं की, मृत्यूचं नेमकं कारण तपासानंतर समोर येईल. पण शंका व्यक्त केली जातेय की तिला हृदयविकाराचा धक्का बसला असू शकतो.
कुटुंबियांनी सांगितले की, तिला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. वृंदा पूर्णपणे तंदुरुस्त होती. शाळा व्यवस्थापनानेसुद्धा तिला कोणताच त्रास नव्हता असं म्हटलंय. ती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची तयारी करत होती. आता मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh