नवी दिल्ली 13 डिसेंबर: मध्यप्रेशातल्या इंदूर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वंदना कसरेकर (Justice vandana kasrekar) यांचं रविवारी कोरोनामुळे (Covid-19) निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एअर लिफ्ट करून दिल्लीला उपचारासाठी हलविण्याचाही विचार सुरू होता. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना शिफ्ट करणे शक्य नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. कसरेकर यांना निवृत्तीसाठी एक वर्षाचा अवधी होता मात्र त्या आधीच त्यांचं निधन झालं.
इंदूरमधल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वय आणि त्यांना असेल्या इतर काही व्याधींमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली. नंतर मल्टिऑर्गन फेल झाल्याने प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही अशी माहिती कोविड नोडल अधिकारी अमित मालाकार यांनी दिली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कसरेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
इंदूर शहरात कोरोनामुळे 811 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने इंदूर उच्च न्यायालयातल्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी घेतली होती. त्यात तब्बल 52 जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या.
गेल्या 8 दिवसांमध्ये देशातल्या दोन हायकोर्ट न्यायमूर्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 5 डिसेंबरला गुजरात हायकोर्टाचे न्यायमूर्ती जीआर उधवानी यांचं निधन झालं होतं.