राहुल गांधींना मध्य प्रदेशच्या सीमेवर घेतलं ताब्यात, मंदसौरला जाण्यापासून रोखलं

राहुल गांधींना मध्य प्रदेशच्या सीमेवर घेतलं ताब्यात, मंदसौरला जाण्यापासून रोखलं

  • Share this:

08 जून : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राहुल गांधी मंदसौर इथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राहुल गांधी पोलिसांना चकवा देत बाईकवरुन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

मंदसौरमध्ये वातावरण चिघळलं असल्याने पोलिसांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्याला परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही राहुल गांधी यांनी मंदसौरला जाण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी राजस्थान सीमेवरच राहुल गांधींना अडवलं होतं. यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार मी मंदसौर इथल्या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तसंच, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं आणि त्यांना पाठिंबा देणं हा गुन्हा आहे, असं कोणता कायदा सांगतो? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

तर राहुल गांधी हे राजकीय पर्यटन करतायेत, अशी टीका भाजपचे जीव्हीएल नरसिंह राव यांनी केलीय.

महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम मध्यप्रदेशातही शेतकरी 1 जूनपासून आंदोलन करत आहेत. मंगळवारी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. राहुल गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घटनास्थळी जात होते. पण पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखल्याने राहुल गांधी मध्य प्रदेश पोलिसांना चकवा दिला. राहुल गांधींनी अखेरच्या क्षण प्लॅन बदलून, कारमधून उतरुन बाईकने छोट्या रस्त्याने निघून गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतलं.

दरम्यान, मंदसौरमध्ये आजही तणावाची परिस्थिती आहे. तिथला टोलनाका आंदोलनकर्त्यांनी तोडून, तो पेटवून दिला आहे. पोलीस आणि निम-लष्करी दलही तैनात करण्यात आलेत पण त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. तर शेतकऱ्यांवर पोलिसांनीच गोळीबार केली अशी कबुली आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांनी दिली आहे. तसंच, चौहान यांनी मंदसौरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओपी त्रिपाठी यांची बदली केली आहे.

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी वेगळीच थिअरी मांडली आहे. 1998 साली मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार असताना असाच गोळीबार झाला होता. त्यात 24 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा मुख्यमंत्री होते दिग्विजय सिंह. मग त्याचा हिशेब काँग्रेस देणार का? तेव्हा मुद्दा होता गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि ते भरपाई मागत होते. मग तेव्हा गोळीबार का केला, असा प्रश्न नायडूंनी केला. मात्र, त्यांनी हे सांगितलं नाही की आता अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती की 5 शेतकऱ्यांचा जीव सरकारला घ्यावा लागला.

First published: June 8, 2017, 3:14 PM IST

ताज्या बातम्या