'जय भवानी, जय शिवाजी...' म्हणत मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलाने केली मोठी घोषणा

'जय भवानी, जय शिवाजी...' म्हणत मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलाने केली मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला होता.

  • Share this:

भोपाळ, 13 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला होता. यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार नकूल नाथ यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

'मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सूचनेनुसार मोहगाव इथं एक भव्य समारंभाचं आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची स्थापना करण्यात येईल. याचा संपूर्ण खर्च माझ्याकडून करण्यात येईल....जय भवानी जय शिवाजी,' असं ट्वीट काँग्रेस खासदार नकूल नाथ यांनी केलं आहे. एकूणच पुतळा हटवल्याने शिवप्रेमींमध्ये निर्माण झालेला संताप कमी करण्याचा मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात येत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुतळा हटवण्यास असलेला विरोध लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने रातोरात बुल्डोझर चालवून चौथरा काढून टाकला. त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आणि स्थानिक युवकांनी नागपूर-छिंदवाडा महामार्ग अडवून धरला होता. याची बातमी News18 lokmat ने मंगळवारी दिली होती.

मध्य प्रदेशात सौंसर नगरपालिकेनं ही पुतळा हटवण्याची कारवाई केली. सौंसर शहरातल्या एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यासाठी शहरातल्या एका युवा संघटनेनं शिवाजी महाराजांचा पुतळाही तयार केला होता. चौकात मध्यभागी एक दगडी चौथरा उभारून त्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. महाराजांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी होता.

या चौथऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, असं कारण देत नगरपालिकेनं या पुतळ्याला परवानगी नाकारली. दिवसा कारवाई केली तर लोकांचा रोष होईल. हे लक्षात घेत नगरपालिकेनं रातोरात हा पुतळा पाडण्याचा निर्णय घेतला. बुल्डोझर मागवून रात्रीच चौथरा उद्ध्वस्त करण्याची कारवाई करण्यात आली. लोकांना हे लक्षात येताच ते रस्त्यावर उतरले. छिंदवाडा -नागपूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. हा पुतळा पुन्हा तिथेच उभा करावा आणि लवकरात लवकर हे काम करावं अशी मागणी करण्यात येत आहे.

First published: February 13, 2020, 10:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading