Home /News /national /

Election 2020 : केवळ भाजप आणि ज्योतिरादित्य नव्हे तर, संपूर्ण शिंदे घराणेशाहीसाठी ही पोटनिवडणूकही ठरली आहे प्रतिष्ठेची

Election 2020 : केवळ भाजप आणि ज्योतिरादित्य नव्हे तर, संपूर्ण शिंदे घराणेशाहीसाठी ही पोटनिवडणूकही ठरली आहे प्रतिष्ठेची

एकेकाळी संपूर्ण राज्यावर वर्चस्व असणाऱ्यांसाठी पोटनिवडणुकीचं (Madhya Pradesh By election) महत्त्व ते काय? पण पक्षांतरानंतर आता ज्योतिरादित्य शिंदेच (Jyotiraditya Scindia) नव्हे तर संपूर्ण शिंदे घराणेशाहीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे, रशीद किडवाईंचं विश्लेषण

पुढे वाचा ...
    रशीद किडवाई भोपाळ, 10 नोव्हेंबर :  मध्य प्रदेशात सत्तापालट घडवून भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्या राजकीय अस्तित्वाची आज परीक्षा आहे. एकेकाळी संपूर्ण राज्यावर वर्चस्व असणाऱ्यांसाठी पोटनिवडणुकीचं महत्त्व ते काय? पक्षांतरानंतर आता ज्योतिरादित्य शिंदेच नव्हे तर संपूर्ण शिंदे घराणेशाहीसाठी ही निवडणूक (Madhya Pradesh By election 2020) प्रतिष्ठेची ठरली आहे, कारण सगळं घराणं इतिहासात पहिल्यांदाच एका बाजूला आहे. अनेक वर्षं काँग्रेसमध्ये राहून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य हे ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याचे वारस असल्यामुळे ही पोटनिवडणूक आणखीन चुरशीची झाली आहे. मध्य प्रदेशात होणाऱ्या 28 जागांवरच्या पोटनिवणुकीपैकी 16 जागा पूर्वीच्या शिंदे संस्थानच्या वर्चस्वाखालच्या ग्वाल्हेर- चंबळ भागातल्या आहेत. संस्थानिकांच्या शिंदे घराण्यातील वंशजांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून ग्वाल्हेरच्या जनतेचं प्रतिनिधित्व केलं आहे. पण या वेळी राजघराण्याच्या राजकारणाला सतत विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशातील काही नेत्यांनी कंबर करून या पोटनिवडणुकीत बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे ज्योतिरादित्य आणि आत्या यशोधराराजे यांनाच शिंदेच्या तत्कालीन ग्वाल्हेर संस्थानात येणाऱ्या 16 विधानसभा निवडणुकीसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले आणि त्याच्या राजकीय वारशाची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. ग्वाल्हेर-चंबळ भागातील या 16 विधनासभेच्या जागांवर ज्योतिरादित्य यांचं राजकीय भवितव्य अवलबूंन असून, त्या जिंकता आल्या तर केंद्रात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळू शकतं आणि स्वत: चा प्रभाव असलेल्या भागातच जर ते आपली किमया दाखवून शकले नाहीत तर राजकीय भविष्याला दीर्घकालीन फटका बसू शकतो. ताजे अपडेट्स LIVE मध्य प्रदेशात पहिल्या फेरीच्या मतमोजणीनुसार भाजप आघाडीवर आहे आणि शिंदे घराण्याला दिलासा देणारे कल आले आहेत. ताजे अपडेट्स इथे पाहा. कोण आहेत भाजपमधील विरोधक? मध्य प्रदेशमधील अनेक नेते भाजपमधील राजेशाहीला विरोध करत आले आहेत. नरेंद्रसिंह तोमर, नरोत्तम मिश्रा, जयभानसिंह पवैया, प्रभात झा आणि अनेक नेत्यांनी नेहमीच ‘महाल’ राजकारणाला कडाडून विरोध केला आहे. या नेत्यांनी या निवडणुकीत ज्योतिरादित्य यांना मदत करण्याऐवजी शिंदे घराण्याच्या भूतकाळातील चुका शोधून काढून त्या सर्वांसमोर पुन्हा मांडल्या आहेत. 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामात तत्कालीन ग्वाल्हेरचे राजे जिवाजीराव शिंदे यांनी ब्रिटिशांची मदत केली होती. त्याची आठवण भाजपचे ग्वाल्हेरमधील नेते आणि माजी मंत्री जयभानसिंह पवैया यांनी या निवडणूक प्रचारात करून दिली. ते म्हणाले, ‘ माणसाच्या आयुष्यातील तत्त्वं कपडे बदलल्यासारखी बदलता येत नाहीत आणि इतिहासही एखाद्याच्या सोयीनुसार बदलता येत नाही.’ ज्योतिरादित्य यांचा भाजप प्रवेश आणि इतिहासातील चूक या दोन्हीवर पवैया यांनी निशाणा साधला. भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभात झा यांनीही ग्वाल्हेरमध्ये काही जमिनी राजघराण्यानी जबरदस्ती बळकावल्या आहेत आणि राजघराण्याचा वारसा असलेल्या काही इमारती बेकायदेशीरपणे विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केले आहेत. विधानसभेचा प्रचारात वैयक्तिक निशाणा या पोटनिवडणुकीच्या प्रचारात पातळी खूपच खाली गेली होती आणि विरोधकांनी आणि शिंदेंनीही वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले होते. ज्यामुळे शिंदे राजघराण्याची प्रतिष्ठा मलीन झाली होती. तत्कालीन ग्वाल्हेर घराण्याच्या साम्राज्यात ग्वाल्हेर-चंबळ आणि उज्जैन-इंदूर हा भाग येत होता. या वेळी पहिल्यांदाच सगळे शिंदे एकाच पक्षात होते. त्यामुळे सगळं सुरळीत होणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात मात्र हे सगळं खूप क्लिष्ट आणि घाणेरड्या स्वरूपाचं झालं. राजकीय शूचिता आणि मर्यादांची लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं नाही असं राजघराण्यातला एकही नेता नव्हता. या प्रचारात सर्वांचीच पातळी घसरली होती. भूतकाळातील भूतं शिंदे घराण्याचा राजकीय वारसा 300 वर्ष जुना आहे. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामावेळी देशभरातून ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं गेलं असताना ग्वाल्हेर संस्थानचे राजे जिवाजीराव शिंदे यांनी ब्रिटिशांना मदत केली होती हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याबरोबर महात्मा गांधींच्या हत्येनंतर नथुराम गोडसेविरुद्धच्या खटल्यासंबंधीचे आरोप (हे आरोप सिद्ध झालेले नाहीत) आणि 1975 मध्ये आणिबाणी जाहीर झाल्यानंतर कर बुडवणं आणि करचोरीमुळे शिंदेंच्या प्रतिष्ठेवर काही डाग लागले आहेत. शिंदेंचा वारसा स्वतंत्र भारतात 1957 पासून आजपर्यंत शिंदे घराण्यातील कोणीतरी व्यक्ती आमदार किंवा खासदार आहेच. 1977 मध्ये माधवराव शिंदेंनी राजमाता विजयाराजे शिंदे यांना विरोध पत्करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक ते जिंकले होते. त्यानंतरही जेव्हा जेव्हा शिंदे राजघराण्यातील कोणतीही व्यक्ती काँग्रेस किंवा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली तेव्हा त्यांच्या राजघराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न प्रचारात पुढे केला गेला. ग्वाल्हेर संस्थानात येणाऱ्या भागात ग्वाल्हेरची प्रजा असं संबोधून ते कुठल्याही पक्षात असले तरीही राजांना विजयी करण्याचं दान ते मागत राहिले. जेव्हा शिंदेविरुद्ध शिंदे अशी निवडणूक असायची तेव्हा ते प्रजेला म्हणायचे ‘माझी लाज राखा’ त्यामुळे मतदार संभ्रमात पडायचा. पण इतिहासात पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये शिंदे घराण्यातील उमेदवार खरोखर त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी जीवाचं रान करताना दिसले. भूतकाळातील अनेक भूतं या प्रचारात त्यांच्यासमोर उभी राहिली. ज्योतिरादित्य आणि त्यांची आत्या यशोधराराजे यांनी राजकीय योद्ध्याप्रमाणे किल्ला लढवावा लागला. त्याचं कारणंही हेच होतं की भाजपच्या नेत्यांनी काठावर बसून बघ्याची भूमिका घेतली. काँग्रेसचा विरोध पक्षांतर्गत नेत्यांनी 1857 चे दाखले दिले पण ज्योतिरादित्यंचा आधीचा पक्ष काँग्रेसही गप्प बसला नाही. त्यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1909 मध्ये लिहिलेल्या 1857 चं स्वातंत्र्य समर या पुस्तकातील सावरकरांची तत्कालीन ग्वाल्हेरचे राजे जिवाजीराजे शिंदे यांबद्दलची मतंच प्रचारात वापरली. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात झाशीच्या राणीविरुद्ध ब्रिटिशांची मदत करणाऱ्या जिवाजीराजांना सावरकरांनी ‘विश्वासघातकी’ आणि ‘भ्याड’ म्हटलं होतं. ‘शिंदे जर देशाचे होणार नसतील तर त्यांना त्यांच्या राजगादीवरून खाली खेचा,’ असं सावरकरांनी म्हटलं होतं. त्याचा वापर काँग्रेसने या वेळी प्रचारात केला. काँग्रेसने हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांनी 1857 च्या स्वातंत्र्यसमारावर केलेल्या सुप्रसिद्ध कवितेचाही प्रचारात आधार घेतला. ज्यात म्हटलं होतं, ‘अंग्रेजों के मित्रा सिंधिया ने छोडी राजधानी थी, बूँदेले बरबोलों के मूँह हमने सुनी कहानी थी, खूब लडी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी’ शिंद्यांनी ब्रिटिशांची मदत केली आणि ब्रिटिशांविरुद्ध झाशीची राणी लक्ष्मीबाई एकटी लढली असं आपण बुंदेलखंडातील लोककवींच्या मुखांतून ऐकलं आहे असा या कवितेचा भावार्थ आहे. काँग्रेस नेत्यांच्याही तोफा काँग्रेस इतक्यावरच थांबला नाही. काँग्रेसचे मध्य प्रदेशाचे उपाध्यक्ष मुरारी लाल दुबे आणि के. के. मिश्रा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ग्वाल्हेर घराण्यातील पाचवे महाराज माधो (1876 ते 1925) यांच्या कुत्र्याच्या समाधीची जागा ज्योतिरादित्य शिंदे यांनी विकल्याचा आरोप केला होता. माधोराजे आजारी असताना 1925 मध्ये पॅरिसला उपचारांसाठी गेले होते. तेव्हा त्यांनी मृत्युपत्रात आपलं कुत्रं हुस्सु याची काळजी घ्यायला त्यांच्या राणी चिंकू यांना सांगितलं होतं. चिंकू यांनी 1930 मध्ये हुस्सुचं निधन झाल्यावर त्याची एक समाधी बांधली होती. ही जागा ज्योतिरादित्य यांनी बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी लावला होता. या सगळ्यामुळे ज्योतिरादित्य खूप दुखावले गेले होते आणि त्यांनी 300 वर्षांपासून मालमत्ता असणाऱ्या श्रीमंत राजघराण्यात जन्म घेणं हा काही गुन्हा आहे का, असा सवाल केला होता. या संपूर्ण पार्श्वभूमीवर निवडणूक जिंकणं ज्योतिरादित्य यांना अवघड आहे. ते या सगळ्या वादळात उभं राहून भाजपकडून आमदार निवडून आणतात का हे आज कळेलच.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Jyotiraditya scindia, Madhya pradesh

    पुढील बातम्या