साध्वी प्रज्ञा जिंकल्या तर समाधी घेण्याची घोषणा करणारे 'मिर्ची बाबा' झाले गायब

साध्वी प्रज्ञा जिंकल्या तर समाधी घेण्याची घोषणा करणारे 'मिर्ची बाबा' झाले गायब

साध्वी प्रज्ञा जिंकल्या आणि 'मिर्ची बाबां'ना ठसका लागला. गुरुवारपासून ते नॉट रिचेबल आहेत.

  • Share this:

भोपाळ 24 मे : भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांचा पराभव केला. मध्य प्रदेशातली ही लढत देशभर चांगलीच गाजली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्विजयसिंग यांनीही साधू संतांची फौज प्रचारात उतरवली होती. दिग्विजय सिंग हरले आणि साध्वी जिंकल्या तर मी जल समाधी घेईन अशी घोषणा कायम चर्चेत राहणाऱ्या मिर्ची बाबांनी केली होती. मतमोजणीनंतर साध्वी प्रज्ञा जिंकल्याचं जाहीर झालं आणि मिर्ची बाबा गायब झाले. तुमच्या प्रतिज्ञेचं काय करणार आहात असं आता लोक त्यांना विचारत आहेत.

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रचारासाठी अनेक साधू, संत, महंत प्रचारात सक्रिय झाले होते. त्याला उत्तर देण्यासाठी दिग्विजय सिंग यांनीही अनेक साधूंना प्रचारात उतरवलं. कॉम्प्युटर बाबा, मिर्ची बाबा असे अनेक तथाकथीत बाबा बुवा प्रचारात उतरले आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने तांत्रिक अनुष्ठान करत दिग्विजय सिंग यांच्या विजयाचा संकल्प सोडत प्रसिद्धी मिळवून घेतली.

मिर्ची बाबा यांनी तर एक यज्ञ करत त्यात तब्बल पाच क्विंटल मिरच्यांची आहुती टाकली. दिग्विजय सिंग हरले तर मी जलसमाधी घेऊन अशी घोषणा त्यांनी केली होती. पण निकाल लागल्यानंतर मिर्ची बाबांना जोरदार ठसका लागलाय. ते गुरुवारपासून 'नॉट रिचेबल' आहेत. सगळे त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र बाबांची कुठे समाधी लागली हे कुणालाच कळले नाही.

पाच क्विंटल मिर्च्या, यज्ञ, मंत्र-तंत्र अशी शो बाजी करणाऱ्या या बाबाने प्रचाराच्या काळात प्रसिद्धी मिळवून घेतली. मोठ मोठ्या घोषणा केल्या. आत मात्र या साधूच्या तोंडचं पाणीच पळालंय. बाबा नेमके कुठे आहेत असा आता सगळे प्रश्न विचारत आहेत.

First published: May 24, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या