भोपाळ 24 जुलै : कर्नाटक नंतर मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार पाडण्याची धमकी देणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चांगलाच दणका दिलाय. दंड विधी संशोधन विधेयकावर भाजपच्या दोन आमदारांनी आज सरकारच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे काँग्रेसला 122 मतं पडली आणि भाजपला हादरा बसला. या दोनही आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. आता आम्हाला घरी परत यायचं आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
कर्नाटकातलं कुमारस्वामी यांचं सरकार पाडल्यानंतर भाजपने काठावरचं बहुमत असलेल्या कमलानाथ यांचं सरकार पाडण्याचे संकेत दिले होते. मनी आणि मसल पॉवरने भाजप सरकारला धोका निर्माण करत आहे असा आरोपही काँग्रेसने केला होता. मात्र राजकारणाच्या आखाड्यात मुरलेल्या कमलनाथ यांनी भाजपला खिंडीत पकडत डाव साधला.
भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कौल यांनी सरकारच्या बाजूने मतदान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. दंड विधी संशोधन विधेयकावर मध्य प्रदेशच्या विधानसभेत वादळी चर्चा झाली. हे विधेयक एकमताने मंजूर व्हावं असं भाजपला वाटत होतं. तर विधेयकावर मतदान व्हावं असा सत्ताधारी काँग्रेसचा आग्रह होता.
मतदान घेऊन बहुमत सिद्ध करण्याची संधी कमलनाथ यांना घ्यायची होती. अध्यक्षांनी मतदान घेण्याचं जाहीर केलं आणि भाजपचे दोन आमदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जोरदार तटबंदी करून भाजपचे दोन आमदार काँग्रेसमध्ये ओढले आणि भाजपला धक्का दिला. मतदानाच्या वेळी या दोनही आमदारांनी क्रास व्होटींग करत सरकारच्या बाजूने मतदान केलं. आता भाजप कुठली खेळी खेळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.