ग्वाहलेर, 1 मार्च : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे (Naturam Godse) माजी भक्त बाबूलाल चौरासिया (Babulal Chaurasia) यांना काँग्रेसनं पक्षात प्रवेश दिला आहे. एकेकाळी नथुराम गोडसेचा पुतळा बसवण्यात आघाडीवर असलेल्या चौरासिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पाहार घातला. चौरासिया यांच्या कृतीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनीच विरोध केला.
काँग्रेस नेते रुपेश यादव यांच्या नेतृत्त्वाखालील काही कार्यकर्त्यांनी गंगाजल शिंपडून गांधीजींच्या प्रतिमेचं शुद्धीकरण केलं आहे. चौरासियांची पक्षातून हकालपट्टी होईपर्यंत आपण त्यांचा विरोध करत राहू असं यादव यांनी स्पष्ट केले आहे.
यादव यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘बाबूलाल चौरासिया सुरुवातीला काँग्रेसी होते. त्यानंतर त्यांनी राजकीय महत्त्वकांक्षेसाठी हिंदू महासभेत प्रवेश केला. तिथं त्यांनी गोडसेची पूजा केली. या व्यक्तीचं हृदयपरिवर्तन झालं ही आश्चर्याची बाब आहे. त्यांनी राजकीय स्वार्थासाठीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते गांधीवादी असू शकत नाही. चौरासिया यांनी गांधीजींच्या प्रतिमेला हार घातल्यानं ती प्रतिमा अशुद्ध झाली होती. आम्ही आता ती स्वच्छ केली आहे.''
कोण आहेत चौरासिया?
बाबूलाल चौरासिया यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चौरासिया हे नथुराम गोडसेच्या मुर्तीची स्थापना करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. इतकचं नाही तर ते गेल्या तीन वर्षांपासून नथुराम गोडसे जयंती कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. यादव आणि काही नेते त्यांचा विरोध करत आहेत. तर आमदार प्रवीण पाठक यांनी त्यांचा बचाव केला आहे.
( वाचा : आसामचा गमछा, केरळ, पुदुच्चेरीच्या नर्स, मोदींच्या लशीचे इलेक्शन कनेक्शन )
चौरासिया हे यापूर्वी देखील काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी पक्षात पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो, असं पाठक यांनी सांगितलं. पाठक यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दाखला दिला. ‘आमच्या पक्षात वडिलांच्या मारेकऱ्याला माफ करणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते आहेत,’ असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.