उत्तर प्रदेश, 30 डिसेंबर : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिनेश शर्मा यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियांका यांना हिंदुत्त्वाबाबत माहिती नाही. त्यांनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे.
प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या वस्त्रावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना दिनेश शर्मा म्हणाले की, भगवे वस्त्र आणि त्याच्या परंपरेबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. उलट प्रियांका यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून धर्माचं पालन कसं केलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नियम न मान्य करणे ही काँग्रेसची परंपरा आहे. मीडियामध्ये आपली प्रतिमा कायम राखण्यासाठी काँग्रेस नेहमी नियमांना पायदळी तुडवत असते, अशी टीकाही शर्मांनी केली. तसंच आज 20-20 मॅच सुरू आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस हे हीच मॅच खेळत आहे. त्यामुळे ते कुणाला जास्त मतं मिळणार यासाठी त्याच्यातच रस्सीखेच सुरू आहे, भगव्या वस्त्रासाठी कलंकीत करण्याचे काम करत आहे, असा आरोपही शर्मांनी केला.
तसंच राज्यातील शांतता भंग करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. कायद्याचे उल्लंघन करण्याचे काम काँग्रेस करत आहे. सीआरपीएफनेही याआधी प्रियांका गांधींनी प्रोटोकॉल तोडलं होतं असं म्हटलं आहे. तसंच त्यांनी महिला पोलिसांवरही गंभीर आरोप केला होता. पण ती महिला आपलं कर्तव्य बजावत होती, या प्रकरणाचा मी निषेध करतो, असंही शर्मा म्हणाले.
प्रियांका गांधींनी काय केली होती टीका?
प्रियांका गांधींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. योगी आदित्यनाथ जे भगवी वस्त्र परिधान करत आहे, तो भगवा रंग त्यांचा नाही. भगवा रंग हा देशाच्या आध्यात्मिक, संस्कृती आणि हिंदू धर्माचे प्रतिक आहे. कृष्ण, राम आणि महादेव शिव यांच्या देशात हिंसा आणि सुडबुद्धीने वागण्याचं हे ठिकाण नाही. महाभारतामध्ये कृष्णाने रणक्षेत्रमध्ये बदला घेण्याची भूमिका घेतली नाही. बदला घेण्याची भावना या देशाची परंपरा नाही. हा देश प्रेम, करूण आणि अहिंसावादी आहे. ही गोष्ट योगी आदित्यनाथ यांना समजली पाहिजे, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं होतं.
दरम्यान,प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी नागरिकत्व सुधारित कायदा (CAA Protest) हिंसाचार प्रकरणात तुरूंगात असलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि समाजसेवक एसआर दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होत्या, तेव्हा त्यांच्या ताफ्याला स्थानिक पोलिसांनी रोखलं. यानंतर प्रियांका कारमधून खाली उतरल्या पायी घराकडे जाण्यासाठी निघाल्या. पण यावेळी एका महिला पोलिसांनी प्रियांका गांधी यांचा गळा पकडला आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रियांका यांनी केला आहे.
प्रियांका गांधी यांनी पायी चालत काढला मोर्चा
सुमारे 4 ते 5 किलोमीटर चालत प्रियांका गांधी एसआर दारापुरी यांच्या घरी पोहोचल्या. यावेळी प्रियांका गांधींचे समर्थक तिथे जमले होते. प्रियांका गांधी यांच्या हालचालींवर पोलीस प्रशासनाची कडी नजर होती. दारापुरीच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्या हिंसाचारामध्ये अटक केलेल्या सदफ जफरच्या घरी गेल्या होत्या. या दरम्यान, लखनऊ पोलिसांनी प्रियांका यांच्यासोबत धक्काबुक्की केली आणि थेट त्यांचा गळा पकडला असा आरोप त्यांनी केला आहे.