लखनऊ 9 जून : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादव यांना हाय ब्लडप्रेशर आणि हाय शुगर आहे त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. काळजीचं कुठलंही कारण नसून योग्य उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दुपारी मुलायमसिंग यादव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने इथल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 79 वर्षांच्या मुलायमसिंग यांची प्रकृती गेल्या काही वर्षांपासून ठिक नसते. वयोमानानुसार आता त्यांना विस्मरणही होतं. दगदग सहन होत नसल्याने ते कार्यक्रमांनाही हजर राहात नाहीत.
मात्र लोकसभा निवडणुकीत काही प्रचार सभांना त्यांनी हजेरी लावली होती. मैनपूरी मतदारसंघातून त्यांनी निवडणुक लढवली होती आणि त्यांचा विजय झाला होता. मायावती यांच्यासोबत त्यांनी एका प्रचारसभेलाही हजेरी लावली होती. मुलायमसिंग आणि मायावती यांचं राजकीय वैर सगळ्यांना माहित आहे. मात्र भाजपचा टक्कर देण्यासाठी अखिलेश यादव यांनी केलेल्या हातमिळवणीला त्यांना पाठिंबा द्यावा लागला होता.
संसदेच्या शेवटच्या सत्रात बोलताना नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून यावं असं वक्तव्य त्यांनी केल्याने राजकीय खळबळ उडाली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा