लखनऊ, 24 जून: होणार होणार म्हणत अखेर बहुजन समाज पक्ष (BSP) आणि समाजवादी पक्ष (Samajwadi Party) यांच्यात काडीमोड जाहीर झाला आहे. बसपा प्रमुख मायावती (Mayawati) यांनी ट्विटवरून ही घोषणा केली आहे. मायावती यांनी दोन्ही पक्षांची महाआघाडी तुटण्याचे खापर समाजवादी पक्षावर फोडले आहे. आगामी काळात होणाऱ्या सर्व छोट्या आणि मोठ्या निवडणुकीत बसपा कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करता स्वबळावर लढणार असल्याचे मायावती यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या आधी पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशामुळे सपा-बसपा पक्षाने लोकसभेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. पण त्याचा निकालावर फारसा फरकच पडला नाही. मायावती यांनी ट्विटकरून या दोन्ही पक्षातील आघाडी तोडल्याचे जाहीर केले. मोदींना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षांनी जानेवारी महिन्यात आघाडीची घोषणा केली होती. पण ही आघाडी अवघ्या 6 महिन्यांच्या आतच वेगळी झाली. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सांगितले की, रविवारी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीत हा निर्णय झाला आहे.
सपाच्या वर्तनामुळे घेतला निर्णय...
2012 ते 2017 या काळात समाजवादी पक्षाने बसपा, दलित अन्य चुकीचे निर्णय घेतले होते. पण देश आणि जनहिताचा विचार करून या गोष्टी विसरून बसपाने त्यांच्यासोबत आघाडी केली होती. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत 'सपा'च्या वर्तनामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे मायावती म्हणाल्या.
अखिलेश यादव अपरिपक्व
आघाडीसाठी अखिलेश यादव पूर्णपणे अपरिपक्व आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक दिवस मी त्यांच्या फोनची वाट पाहत होते. ते बोलण्यासाठी येतील अशी अपेक्षा होती. पण ते आले नाहीत. अशा परिस्थितीत 'सपा'सोबत आघाडी ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. 'सपा'कडून जे सहकार्य मिळायला हवे हेते ते मिळाले नाही. मी अनेक वेळा अखिलेश यांच्याकडे सहकार्यासाठी आग्रह केला पण त्यांना कळालेच नाही. लोकांच्यामध्ये असे सांगितले जात आहे की, बसपाचे 10 खासदार 'सपा'च्या सहकार्यामुळे निवडूण आले. पण वास्तव असे नाही. 'सपा'कडून जो दावा केला जात आहे ते खरा असता तर अखिलेश यांना पत्नी डिंपल यांना का निवडूण आणता आले नाही, असा सवाल मायावती यांनी बैठकीत उपस्थित केला.
मुलायम यांनी ताज कॉरिडोरमध्ये फसवले
ताज कॉरिडोर प्रकरणात मला फसवण्यात केवळ भाजप नाही तर मुलायम सिंह यादव यांचा देखील हात आहे. हा इतिहास विसरुन मी मुलायम यांच्यासाठी मते मागण्यासाठी गेले. पण अखिलेश यांना त्याची किमत नाही. निवडणुकीनंतर त्यांनी मला फोन देखील केला नाही, असे मायावती म्हणाल्या. इतक नव्हे तर अखिलेश यांनी मुस्लिम व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देऊ नका असा सल्ला दिल्याचा आरोप मायावती यांनी बैठकीत केला. त्याचा फटका बसपाला बसल्याचे त्या म्हणाल्या.
VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं