लखनौ, 29 ऑगस्ट : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आज एका डबल मर्डरने हादरली. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या सरकारी वसाहतीच्या वस्तीत भर दिवसा वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीचा आणि तरुण मुलाचा खून झाला. या गुन्ह्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप उघड झालेलं नाही. पण घटना घडली तेव्हा मुलगीसुद्धा घरात होती, पण तिला कुठलीही इजा झालेली नाही. त्यामुळे संशयाची सुई मुलीवरच आहे.
Indian Railways चे वरिष्ठ अधिकारी असलेल्या राजेश दत्त वाजपेयी यांच्या घरात ही घटना घडली. वाजपेयी सध्या दिल्लीत पोस्टिंगला आहेत. लखनौच्या त्यांच्या घरात पत्नी आणि दोन मुलं राहात होती.
अज्ञात गुन्हेगारांनी घरात घुसून वाजपेयी यांची 49 वर्षांची पत्नी आणि 20 वर्षांच्या मुलाला गोळ्या घातल्या. या वेळी मुलगी घरात होती. तिनेच हा प्रकार नोकराच्या कानावर घातला आणि नोकराने पोलिसांना कळवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पण या प्रकरणी मुलीवरच संशय असल्याने तिला ताब्यात घेतलं असल्याची news18 च्या सूत्रांची माहिती आहे.
राजेश दत्त वाजपेयी यांची मुलगी शूटर आहे. ती घरात असताना या दोन हत्या झाल्या. तसंच पोलीस तपासात घरात कुणी जबरदस्तीनं घुसलं असेल अशा कुठल्याही खुणा दिसलेल्या नाहीत. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आहे.
या रेल्वे अधिकाऱ्याचं घर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ आहे. घटनेची माहिती कळल्यास पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी तातडीने घटनास्थळी पोहोचले. ज्या घरात हे दोन खून झाले, तो परिसर कडक सुरक्षा व्यवस्थेसाठी ओळखला जातो. या घराकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्हीची निगराणी आहे. असं असतानाही लखनौच्या सर्वांत सुरक्षित मानल्या गेलेल्या भागातच दुहेरी खून झाल्याने खळबळ उडाली. माध्यम प्रतिनिधी आणि बघ्यांची गर्दी या ठिकाणी जमली आहे. पुढचा तपास सुरू आहे.