लखनऊ 26 जानेवारी : लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने राम मंदिराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रश्नावर महत्त्वाचं वक्तव्य दिलं आहे. सुप्रीम कोर्टानं हा प्रश्न जर आमच्याकडे सोपवला तर 24 तासात राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढू असं मत त्यांनी व्यक्त केलं. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
आदित्यनाथ म्हणाले, "गेली कित्येक वर्ष हा प्रश्न सुप्रीम कोर्टात रेंगाळला आहे. माझं कोर्टाला आवाहन आहे की त्यांनी तातडीनं सुनावणी करून प्रश्न निकाली काढला पाहिजे. कोर्टाला हे शक्य नसेल तर त्यांनी ते प्रकरण आमच्या हाती सोपवावं. 24 तासात प्रश्न निकाली काढू."
ते पुढे म्हणाले, " 2010मध्ये अलहाबाद कोर्टानं निकाल देऊन सध्या मंदिर असलेल्या ठिकाणीच रामाचा जन्म झाला असा निकाल दिला होता. त्यामुळं आता निर्णयास जास्त वेळ लागू नये." या आधी सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिराच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
'अयोध्येत लवकरच राम मंदिर उभारणीला सुरुवात होणार'
अयोध्येत लवकरच राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होईल असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरासंदर्भात जे वक्तव्य केले आहे ते सकारात्मकच आहे असेही भागवत म्हणाले. नागपूरात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर होणार नाही असे कुठले म्हंटले नाही फक्त न्यायालयीन प्रक्रियेनंतर होईल असे ते म्हणाले असेही भागवत यांनी सांगितलं.
आम्हाला राम मंदिर हवेच आहे राम मंदीरासाठी सरकारने संसदेत विधेयक आणून कायदा करावा किंवा राष्ट्रपतींद्वारे अध्यादेश काढून राम मंदीराचे निर्माण कार्य सुरु करावं असं मतही भागवत यांनी व्यक्त केलं.
राम मंदिरावर काय म्हणाले होते मोदी?
राम मंदिराचा प्रश्न काँग्रेसमुळेच रखडला आहे. काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी वकिलपत्र घेतलीत त्यांनीच त्यात अडथळे आणलेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत केला होता. हा प्रश्न लवकर निकाली निघावा असं वाटत असेल तर काँग्रेसने आपल्या नेत्यांना सांगितलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं.
राम मंदिरावर आणखी काय म्हणाले मोदी?
राम मंदिराचा निर्णय हा राज्य घटनेच्या चौकटीत राहुनच घेतला जाईल. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा राम मंदिराबाबत हेच सांगितलं होतं. गेली 70 वर्ष सरकारमध्ये बसलेल्या लोकांनीच या प्रकरणात अडथळा आणला. आजही हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना विनंती करतो की, देशातील शांती, सामाजिक सलोखा टिकावा यासाठी काँग्रेसने आपल्या वकिलांना या प्रकरणात कोणताही प्रकाराच अडथळा आणून नये असं सांगावं.
कोर्टात काँग्रेसच्या वकिलांचा अडथळा जर बंद झाला पाहिजे. कोर्टाची प्रक्रियाही त्यांच्या नियमाप्रमाणे सुरू राहिली पाहिजे. त्याला राजकीय चषम्यातून पाहू नये. हे प्रकरण कोर्टात आहे, कोर्टात या प्रकरणाचा निकाल लागेल. त्यानंतर सरकारची जबाबदारी जिथे सुरू होते, तिथे आमचे पूर्ण प्रयत्न राहतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.