नवी दिल्ली, 17 डिसेंबर : संरक्षण क्षेत्रात भारताची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे. देशाच्या संरक्षणच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व सामग्री उपलब्ध असावी, यासाठी सरकार काम करत आहे. तसंच अनेक गोष्टी देशातच तयार केल्या जाव्यात, यासाठीही सरकार प्रयत्न करत आहे. सध्या भारतात महेश्वरास्त्र नावाची एक रॉकेट सिस्टीम तयार केली जातेय. भगवान शंकरांकडे असलेल्या अस्त्रावरून त्याचं नाव ठेवण्यात आलंय. शंकरांच्या अस्त्राप्रमाणेच हे अस्त्रही काम करील, असं बोललं जात आहे.
लांब पल्ल्याच्या लक्ष्यावर मारा करण्यासाठी भारतात सध्या महेश्वरास्त्र नावाची एक रॉकेट सिस्टीम तयार केली जात आहे. सोलर इंडस्ट्रीज ही कंपनी ही रॉकेट सिस्टीम तयार करत आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अस्त्राचं नाव भगवान शंकरांच्या अस्त्राच्या नावावरून घेतलंय. त्याची ताकदही तितकीच असणार आहे. या रॉकेट सिस्टीमची महेश्वरास्त्र 1 आणि महेश्वरास्त्र 2 अशी दोन व्हर्जन्स बनवण्यात येणार आहेत. ही गायडेड रॉकेट सिस्टीम असेल. पहिल्याची रेंज 150 किलोमीटर्स, तर दुसऱ्याची रेंज 290 किलोमीटर्स असेल.
पुराणकथांमध्ये शंकरांच्या अस्त्राचा उल्लेख आढळतो. या अस्त्रामध्ये शंकरांच्या तिसऱ्या डोळ्याची ताकद होती. या अस्त्रामुळे कोणीही सहज जळून खाक होत होतं. सध्या बनवण्यात येणाऱ्या अस्त्रामध्येही तशीच ताकद असेल. त्याला देशी हिमार्स (Desi HIMARS) असंही म्हणता येईल.
वाचा - रशियाकडून युक्रेवर पुन्हा मिसाईल हल्ले, प्रमुख शहरं निशाण्यावर
ही अस्त्रं दीड वर्षात पूर्ण होतील. या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांचा खर्च नियोजित आहे. या अस्त्रांचं वैशिष्ट्य त्यांचा वेग हेच आहे. ध्वनीच्या गतीच्या 4 पट जास्त वेगानं हे अस्त्र लक्ष्याकडे झेपावेल. म्हणजेच 5680 किलोमीटर प्रतितास इतका त्याचा वेग असेल. एका सेकंदामध्ये जवळपास दीड किलोमीटर हे अस्त्र जाईल. महेश्वरास्त्रचं दुसरं व्हर्जन ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या तोडीचं असेल. ही दोन्ही अस्त्रं मल्टिपल रॉकेट लाँचर सिस्टीमवरून डागली जातील. टॅक्टिकल बॅलिस्टिक मिसाइल सिस्टीममध्येही त्यांची गणना केली जाऊ शकते. M142 (High Mobility Artiller Rocket System) प्रमाणेच हे असेल. आता भारताला मल्टिपल रॉकेट सिस्टीम खरेदी करण्याची आवश्यकता नाही. ज्या आधीच्या आहेत, त्याच अपग्रेड केल्या जातील. नवीन सिस्टीम्स देशातच तयार केल्या जातील. यामुळे संरक्षण विभागाचा खर्च कमी होईल व देशांतर्गत कंपन्यांना लाभ मिळेल. याची चाचणी दीड वर्षानंतर केली जाईल. ही रॉकेट्स कोणत्याही ऋतूत कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात मारा करू शकतील. त्यावर पारंपरिक हत्यारं लावली जातील. सैन्याची तुकडी, बंकर, टॅंक, वाहनांना उडवण्यासाठी त्यांची मदत होईल.
सध्या आपल्याकडे पिनाका गायडेड रॉकेट सिस्टीम आणि सरफेस टू सरफेस मिसाइल यांच्या मधल्या एखाद्या अस्त्राची कमतरता आहे. पिनाकाची रेंज 75 किलोमीटर्स, तर एसएसएमची रेंज 350 किलोमीटर्स आहे. महेश्वरास्त्र रॉकेट गायडेड सिस्टीम याच्या मधल्या क्षमतेचं असेल. भारताच्या या नव्या अस्त्रामुळे पाकिस्तान आणि चीनच्या या देशांसोबत असलेल्या सीमा अधिक सुरक्षित केल्या जाऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army