Home /News /national /

तर तो बलात्कार असू शकत नाही.... Rape case संदर्भात हायकोर्टाची महत्त्वपूर्ण नोंद

तर तो बलात्कार असू शकत नाही.... Rape case संदर्भात हायकोर्टाची महत्त्वपूर्ण नोंद

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या घटना आपण वाचत असतो. मात्र अशा घटनांचं सरसकटीकरण करणं योग्य नाही हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निकालातून समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : 'लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक' किंवा 'लग्नाचं (marriage) आमिष दाखवून बलात्कार (rape case)' अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. अशा प्रकरणात संबंधित पुरुषावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. आता मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) यासंबंधाने एक महत्त्वाचं विधान केलं आहे. न्यायालयासमोर दाखल झालेल्या एका बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना याबाबतचा निर्वाळा दिला आहे. एका महिलेने एका पुरूषाशी दीर्घकाळ ठेवलेल्या शरीरसंबंधानंतर दाखल केलेल्या बलात्काराच्या तक्रारीबाबत बोलताना न्यायालयाने हे विधान केलं आहे. दिल्ली हायकोर्टानं म्हटलंय, "लग्नाचं वचन हे अनिश्चित काळासाठी शरीरसंबंध ठेवण्याचं आमिष म्हणून पाहिलं जाऊ शकत नाही. न्यायाधीश विभू बाखरू यांनी म्हटलं, 'जेव्हा एखादी स्त्री तात्कालिक किंवा क्षणिक स्वरूपात एखाद्याच्या जाळ्यात फसते तेव्हा तो शरीरसंबंध लग्नाच्या खोट्या वचनावर आधारित आहेत असं म्हणता येईल. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीची सहमती नसताना त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाऊ शकते. अशावेळी संबंधित व्यक्तीला नकार द्यायचा असूनही तिला तिथे सहमतीचा मुद्दा आणता येत नाही.' केवळ अशाच प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला फसवण्याच्या हेतूने लग्न करण्याचे खोटे वचन म्हणजे सहमतीचा भंग मानला जाऊ शकतो. अशावेळी आयपीसी 375 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. मात्र ज्या प्रकरणात सततचे दृढ शरीरसंबंध असतात, ज्यात दीर्घकाळ ठेवलेल्या शरीरसंबंधांचाही समावेश होतो, त्यांना वेगळ्या पद्धतीने पाहिले जावे. असे संबंध 'अनैच्छिक आणि आकर्षणविरहीत, केवळ लग्नाच्या आमिषातूनच निर्माण झालेले' असे असू शकत नाहीत. असंही न्यायाधीशांनी म्हटलंय. बाखरू यांनी ट्रायल कोर्टानं संबंधित पुरूषाची निर्दोष मुक्तता करताना दिलेल्या आदेशाचं समर्थन करताना या बाबी नोंदवल्या. यासंदर्भात महिलेनं अपील केलं होतं. 'संबंधित पुरुषानं आपली फसवणूक केली असून लग्नाचे आमिष दाखवत आपल्याशी पुन्हा-पुन्हा शरीरसंबंध ठेवले. शिवाय नंतर तिला सोडून तो दुसऱ्या महिलेकडे निघून गेला.' असं ही महिला म्हणाली होती. हाय कोर्टानं म्हटलं, की हे उघड आहे, की या महिलेनं आपल्या इच्छेनुसार शरीरसंबंध ठेवले. ती या पुरुषाकडे आकर्षित झाली होती. ट्रायल कोर्टानं घेतलेल्या  शोधादरम्यान हे उघड झालं होतं, की ही महिला आणि संबंधित पुरुषात आधी शरीरसंबंध प्रस्थापित होऊन पुन्हा कधी तरी लग्नाविषयीचा संवाद झाला होता. यात लग्नाचं आमिष दाखवण्याचा प्रश्न येत नाही. हायकोर्टानं याही बाबीकडे लक्ष वेधलं, की या महिलेनं 2008 मध्ये संबंधित पुरुषासोबत संबंध ठेवले होते. त्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर या पुरुषाने तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं. 'यातून संबंधित महिलेचा लग्नाच्या वचनावर आधारित शरीरसंबंध ठेवल्याचा आणि फसवणूक झाल्याचा दावा खोटा ठरतो.' असंही कोर्टानं नोंदवलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi, Marriage, Rape

    पुढील बातम्या