भोपाळ, 30 एप्रिल : भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद अद्याप देखील शमलेला नाही. त्यातच मावळत्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी साध्वींची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
साध्वींनंतर आता सुमित्रा महाजन यांचं शहीद करकरेंबद्दलचं विधान वादग्रस्त ठरतंय. इंदूरमध्ये बोलताना सुमित्रा महाजन यांनी शहीद हेमंत करकरेंच्या ATS प्रमुख भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कर्तव्य बजावताना एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. पण, ATS प्रमुख म्हणून त्यांची भूमिका अयोग्य होती, असं सुमित्रा महाजन यांनी इंदूरमध्ये म्हटलं होतं. 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
सुमित्रा महाजन या इंदूर लोकसभा मतदारसंघातून 8 वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सुमित्रा महाजन यांनी हेमंत करकरेंच्या ATS प्रमुख असतानाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे यांचे संबंध चांगले होते असं देखील सुमित्रा महाजन म्हणाल्या. दिग्विजय यांनी आरएसएसवर सतत बॉम्ब बनवत असल्याचे आरोप केले होते. शिवाय, त्यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं काही जणांना इंदूरमधून अटक केली होती असं देखील यावेळी महाजन म्हणाल्या.