नवी दिल्ली 15 जानेवारी : लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. या सर्वात आघाडी होती ती भाजपची. नरेंद्र मोदींनाही तंत्रज्ञानाची आवड असल्याने त्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतला. त्यामुळे जनमत घडविण्यात त्यांना त्याचा फायदा झाला आणि भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला.
या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यापासून धडा घेत राहुल गांधींनी यावेळी जय्यत तयारी केली आहे. दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात हायटेक वॉर रूम तयार करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधता यावा यासाठी काँग्रेसने खास 'शक्ती' हे अॅप तयार केलं आहे. या अॅपवर राहुल गांधींचा पूर्ण विश्वास असून अनेक मोठे निर्णय घेण्याआधी ते या अॅपच्या माध्यमातून फिडबॅक घेत असतात.
यासाठी काँग्रेसने खास विभागही तयार केलाय. मल्टिनॅशनल कंपनीत काम केलेला प्रवीण चक्रवर्ती हे या डेटा बँकेचे प्रमुख आहेत. निवडणुकीत डेटाचं महत्त्व ओळखून काँग्रेसने गेली वर्षभर देशभरातून प्रचंड मोठा डेटा गोळा केलाय.
आत्तापर्यंत तब्बल 60 लाख काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे अॅप डाऊनलोड केलंय.
या अॅपवरची सर्व माहिती आणि विश्लेषण हे फक्त काँग्रेसच्या अध्यक्षांनाच बघता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून देशभरातल्या 300 मतदार संघांवर काँग्रेसने फोकस केला आहे. तुमच्या मतदासंघातून जिंकण्याची क्षमता असलेला कुठला उमेदवार आहे, मतदार संघाचे महत्त्वाचे प्रश्न, विविध विषयांवरची मतं अशा अनेक गोष्टींबाबत राहुल गांधी कार्यकर्त्यांकडून या अॅपच्या माध्यमातून मतं अजमावत असतात.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरवतानाही राहुल गांधी यांनी या माध्यमाचा उपयोग केला होता. त्याच बरोबर रिअल टाईम सर्व्हे करण्याची सोयही या अॅपच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे 2019 मध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसची मोठी भिस्त या शक्ती अॅपवर असणार आहे.