गांधी घराण्याच्या आपसातल्या संघर्षामुळे 'या' मतदारसंघाकडे आहे लक्ष

गांधी घराण्याच्या आपसातल्या संघर्षामुळे 'या' मतदारसंघाकडे आहे लक्ष

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या या मतदारसंघात गांधी घराण्यातल्या चुलत भावंडांचा आपसातला संघर्ष पाहायला मिळू शकतो. हे आहे कारण...

  • Share this:

नवी दिल्ली 12 मार्च : मेनका गांधी या पीलीभीत ऐवजी हरियाणामधल्या करनालमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या यायला  लागल्या आहेत. पिलिभितमध्ये मुलगा वरुण गांधी यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची इच्छा आहे. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हा निर्णय सोपवण्यात आला असल्याचं बोललं जात असलं, तरी पीलीभीत लोकसभा मतदारसंघाकडे आता नजर आहे गांधी घराण्यातल्या भावंडांमुळे.

पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी खांद्यावर घेत प्रियांका गांधी वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात एंट्री केली. पीलीभीत याच पूर्व उत्तर प्रदेशाचा भाग आहे. त्यामुळे वरुण गांधी विरुद्ध प्रियांका गांधी असं युद्ध बघायला मिळणार आहे. प्रियांका गांधी स्वतः निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. पण या प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्या पूर्ण ताकदीने इथे प्रचार करणार हे नक्की. मनेका गांधींविरोधात त्या कशा प्रचार करतात याविषयी उत्सुकता होती. आता मनेका ऐवजी वरुण गांधी उत्तर प्रदेशातल्या या मतदारसंघातून उभे राहिल्यास चुलत भावंडं एकमेकांविरोधात प्रचार करतील.

घराणेशाही, काका पुतण्याची लढाई या गोष्टी काही आता नवीन राहिल्या नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणात काका - पुतण्यांची आणि चुलत भावंडांची लढाई सर्वश्रुत असताना राष्ट्रीय राजकारणात देखील चुलत भावंडा लढाई सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशवर काँग्रेसची नजर

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर आता काँग्रेसनं उत्तर प्रदेशवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये देशाचं राजकारण बदलण्याची ताकद आहे. शिवाय, पंतप्रधान ठरवताना देखील उत्तर प्रदेशची भूमिका महत्त्वाची असते. अशा स्थितीमध्ये उत्तर प्रदेश जिंकण्याच्या उद्देशानं काँग्रेसनं पूर्व भागाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी ही प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर दिली आहे.

पूर्व उत्तर प्रदेशातील 41 जागांची जबाबदारी ही प्रियांकांच्या खांद्यावर तर, 39 जागांची जबाबदारी ही ज्योतिरादित्य शिंदे यांच्या खांद्यावर आहे.  पिलिभितची जबाबदारी भाजपने केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याकडे दिलेली आहे. त्यामुळे पीलीभीतमधील लढत ही मनेका गांधी विरुद्ध प्रियांका गांधी या काकी – पुतणीमध्ये रंगणार आहे.

पीलीभीतमध्ये मनेका गांधींचं वर्चस्व

1989 ते 2014 या काळात मेनका गांधी या सहा वेळा पीलीभीतमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. शिवाय, 2009मध्ये वरुण गांधी देखील पिलिभितमधून विजयी झाले आहेत. मतांची टक्केवारी आणि मतांचा आकडा पाहता पिलिभितनं कायम मेनका गांधी यांना साथ दिलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर अमेठी आणि रायबरेलीप्रमाणे पीलीभीत हा मनेका गांधी यांचा गड राहिला आहे. त्यामुळे मनेका गांधी यांच्या वर्चस्वाला आव्हान देणं प्रियांका गांधी यांच्यापुढे मोठं आव्हान असणार आहे.


पीलीभीतचा इतिहास


स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत पीलीभीत मतदारसंघातून काँग्रेसचा विजय झाला होता. त्यानंतर फार कमी वेळा काँग्रेसला इथून मोठं यश मिळालं आहे. जनता पक्षाने इथून निवडणुका जिंकलेल्या आहेत. 1980 मध्ये संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर मनेका गांधी हळूहळू गांधी घराण्यापासून आणि काँग्रेसपासून अलग झाल्या. सुरुवातीला पीलीभीतमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या आणि जिंकून आल्या. 1994 पासून भाजपच्या तिकिटावर त्या निवडणूक लढवत आहेत. पीलीभीतवर मनेका यांची पकड तेव्हापासून मजबूत आहे.


मतदारसंघाची रचना पाहिल्यास इथे मुस्लीम मतदारही मोठ्या संख्येने आहेत हे विशेष. 30 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम लोकसंख्येचा हा प्रदेश आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा प्रचारात आल्यास याचा परिणाम यंदाच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


एकूण मतदार 16,50,000

पुरुष मतदार - 9,00,000

स्त्री मतदार - 7,50,000


वरुण – प्रियांकामध्ये वाकयुद्ध!

2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वरुण संजय गांधी यांनी पीलीभीतमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी अल्पसंख्यांकांचे हात तोडण्याची भाषा केली होती. वरूण गांधी यांच्या या विधानावरून प्रियांका गांधी यांनी, 'गांधी कुटुंबानं समाज एकसंध ठेवण्याकरता प्रयत्न केले. मात्र, वरुण यांनी समाजात दुफळी माजवण्याची भाषा करून कुटुंबाची मर्यादा ओलांडली' अशी टीका केली होती. त्यानंतर वरुण यांनी सभ्यतेची लक्ष्ण रेषा ओलांडली नसल्याचं म्हटलं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र वरुण गांधी यांनी सुलतानपूरमधून निवडणूक लढवली होती.

भावंडं एकत्र येणार?

प्रियांका गांधी यांचे चुलत बंधू वरुण गांधी भाजपमध्ये नाराज आहेत. शिवाय, पक्षात ते सक्रीय देखील नाहीत. त्यामुळे भाजपला धक्का देत वरूण गांधी 'काँग्रेसचा हात' पकडण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये असल्यानंतर देखील वरूण गांधी यांनी सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींवर टीका केलेली नाही. शिवाय, आता भावंडांमधील कटुता संपल्यामुळे वरूण गांधी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यास आश्चर्य वाटायला नको!


VIDEO : गुजरातमधील प्रियांका गांधींची पहिली सभा, UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या