इतिहास घडवणारे निवडणुकीतील नारे; कोणी झालं पंतप्रधान तर...

इतिहास घडवणारे निवडणुकीतील नारे; कोणी झालं पंतप्रधान तर...

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत अशा घोषणा दिल्या गेल्या ज्याचा मतदारांवर प्रभाव पडला.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मार्च: निवडणूक मग ती कोणतीही असो अशी एखादी घोषणा असते ज्यामुळे संपूर्ण निवडणुकीचे चित्रच बदलते. गेल्या म्हणजे 2014च्या निवडणुकीत 'अब की बार मोदी सरकार' ही घोषणा लोकप्रिय झाली होती. निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकदा एका घोषणेवर संपूर्ण निवडणूक लढवली जाते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत अशा घोषणा दिल्या गेल्या ज्याचा मतदारांवर प्रभाव पडला. राजकीय नेते त्यांची आश्वासने एका प्रॉडक्ट प्रमाणे जनतेपर्यंत पोहोचवतात, असे विचारवंत मॅक्स वेबर याने म्हटले आहे. जाणून घेऊयात अशाच काही घोषणा...

जय जवान, जय किसान- 1965मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान देशाचे मनोबल वाढवण्यासाठी तात्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसला याचा मोठा फायदा झाला. 65च्या युद्धात देशात अन्न धान्याचे उत्पादन कमी होते. जवानांचे आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शास्त्री यांनी ही घोषणा दिली होती. याच घोषणेत अटल बिहारी वाजपेयी यांनी 'जय विज्ञान' हा शब्द जोडला होता.

समाजवादियों ने बांधी गांठ, पिछड़े पांव सौ में साठ: 70च्या दशकात समाजवाद्यांनी दिलेला हा नारा दिला होता. यामुळे राजकारणात मोठे बदल देखील झाले. यामुळे प्रथमच जातीच्या आधारावर मतांची विभागणी झाली होती. एक नवा ओबीसी मतदार निर्माण झाला होता. या घोषणेचा परिणाम मंडल आयोग आणि आरक्षण देण्यात झाला.

गरीबी हटाओ: 1971च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यांनी 'गरीबी हटाओ' हा नारा देत ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयानंतरच 'इंदिरा इज इंडिया' असे बोलले गेले. इंदिरा गांधींच्या या घोषणेचा नंतर राजीव गांधी यांनी देखील वापर केला.

इंदिरा हटाओ, देश बचाओ: इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणिबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांनी हा नारा दिला होता. आणिबाणीच्या काळात विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. या घोषणेचा परिणाम असा झाला की देशात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत आली. जनतेने 1977च्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेच्या बाहेर केले. एका घोषणेमुळे केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा पराभव होण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिली घटना होती.

राजा नहीं फकीर है, देश की तकदीर है: इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांना ऐतिहासिक विजय मिळवला होता. काँग्रेसचा हा विजय रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षाचे नेतृत्व करणारे व्ही.पी.सिंह यांनी हा नारा दिला होता. या नाऱ्याला उत्तर म्हणून काँग्रेसने 'फकीर नहीं राजा है, सीआईए का बाजा है।' हा नारा दिला होता.

मिले मुलायम-कांशीराम, हवा हो गए जय सिया राम: 1993मध्ये उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने राम मंदिराचा मुद्दा मोठा केला होता. भाजपला रोखण्यासाठी सपा-बसपाने आघाडी केली होती. या आघाडीसाठी हा नारा तयार करण्यात आला होता. याचा इतका प्रभाव पडला की विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा रथ थांबला.

तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार: हा नारा बसपाचे संस्थापक काशीराम यांनी 80च्या दशकात दिला होता. पण काशीराम यांच्यानंतर मायावती यांनी केवळ बहुजन यांच्या भोवतीचे राजकारण न करता त्यात सर्वांचा समावेश केला.

सबको देखा बारी-बारी, अबकी बारी अटल बिहारी: 1996च्या लखनऊ येथील रॅलीत सर्वात प्रथम ही घोषणा देण्यात आली होती. यानंतरच वाजपेयी यांना केंद्रात सत्ता मिळवता आली होती. अर्थात पहिल्या वेळी वाजपेयींना केवळ 13 दिवसांचे सरकार स्थापन करता आले होते.

काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ: हा नारा देऊन काँग्रेसने 2004च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करुन पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन केली होती. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकादा सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून हा नारा तयार केला होता.

मां, माटी, मानुष: पश्चिम बंगालमधील 2010च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ही घोषणा दिली होती. ममता बॅनर्जी यांच्या पुस्तकातून हा नारा घेण्यात आला होता.

अबकी बार, मोदी सरकार: 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातचे तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. मोदींची लोकप्रियता आणि काँग्रेस नेतृत्वाखालील युपीए सरकारचे अपयश यामुळे भाजपने स्वबळावर प्रथमच केंद्रात सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत अबकी बार, मोदी सरकार आणि 'अच्छे दिन आने वाले हैं' गे नारे प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यामुळेच भाजपला ऐतिहासिक असा विजय मिळवता आला होता.

कट्टर सोच नहीं, युवा जोश: 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने हा नारा दिला होता. पण त्याचा फायदा पक्षाला झाला नाही. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने राहुल गांधी यांच्याकडे सर्व जबाबदारी सोपवली होती. पण काँग्रेसचा या निवडणुकीत सर्वात मोठा पराभव झाला.

मोदी हैं तो मुमकिन है: 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक घोषणा व नारे चर्चेत आहेत. भाजपने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचे ठरवले आहे. यासाठी भाजपने सुरुवातीच्या टप्प्यात 'मोदी हैं तो मुमकिन है' हा नारा दिला आहे.

सुजयपासून ते शरद पवारांपर्यंत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? UNCUT पत्रकार परिषद

 

First published: March 14, 2019, 4:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading