नवी दिल्ली 12 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोन जागांवरून निवडणुक लढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय ते वाराणशीकडे. 2014 ची लोकसभा निवडणुक गाजली होती ती वाराणशीतल्या मुकाबल्यामुळे. त्यावेळी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल मोदींविरोधात मैदानात उतरले होते. त्यामुळे त्यावेळी त्याची चर्चाही खूप झाली. मात्र 2019मध्ये केजरीवाल काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
मात्र 2019 ची लोकसभा निवडणुक अरविंद केजरीवाल लढणार नाहीत असं आपचे खासदार संजय सिंह यांनी जाहीर केलंय. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी आपलं पूर्ण लक्ष दिल्लीतच केंद्रीत केलंय. त्यामुळे ते दिल्ली सोडून जाणार नाहीत.
पण आप मोदींविरोधात मजबूत उमेदवार देणार असल्याचंही संजय सिंह यांनी सांगितलं.
मोदी कुठून लढणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणुका या ओडिसामधून लढू शकतात असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रदीप पुरोहित यांनी बुधवारी केला आहे. ओडिसाच्या पुरी शहरातून पंतप्रधान मोदी निवडणूक लढण्याची 90 टक्के शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे गेल्यावेळेस वाराणसी आणि बडोदा या दोन ठिकाणांहून निवडणूक लढले होते. ते यावर्षी कुठून निवडणूक लढणार असा सस्पेंस होता. नरेंद्र मोदी हे आगामी निवडणूक वाराणसी येथून लढणार असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं.
'कुणाला चांगले वाटावे यासाठी आम्ही कधीच निर्णय घेतले नाहीत, तर चांगले परिणाम देणारे निर्णय आम्ही घेतले आहेत. युती करून आम्ही सत्ता मिळवली, पण देशहिताचेच निर्णय आम्ही घेतले. त्यात आम्ही कधी समझौता केला नाही.' असंही अमित शहा म्हणाले होते.
तर एकीकडे'पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिसाच्या लोकांवर खूप प्रेम करतात आणि पुरी शहर हे त्यांच्या जिव्हाळ्याचं आहे. त्यामुळे ते पुरीमधून निवडणुका लढतील' असं प्रदीप पुरोहित यांनी म्हटलं होतं.
पुरोहित पुढे म्हणाले की, 'पंतप्रधानांनी 2014ला लोकसभा निवडणुका वाराणसीमधून लढल्या होत्या. जगन्नाथाच्या आशीर्वादामुळे यावेळी ते पुरीमध्ये निवडणुका लढवू शकतात. यावर पार्टीचं संसदीय बोर्ड निर्णय घेईल.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Narendra modi, Varanasi, अरविंद केजरीवाल, आप, नरेंद्र मोदी