राहुल गांधींच्या राजीनाम्याची शक्यता, काँग्रेसमध्ये नवा सिंग होणार 'किंग'?

राहुल गांधींच्या राजीनाम्याची शक्यता, काँग्रेसमध्ये नवा सिंग होणार 'किंग'?

काँग्रेसचं अध्यक्षपद बऱ्याच वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे जाणार, याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचं अध्यक्षपद बऱ्याच वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेस नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसची देशभरात वाताहत होत असताना अमदरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये काँग्रेससाठी चांगली कामगिरी केली आहे. तसंच त्यांची प्रतिमाही काँग्रेससाठी फायद्याची ठरू शकते. या पार्श्वभूमीवर त्यांचं नाव चर्चेत आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत का झाला काँग्रेसचा पराभव?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाच त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ अमेठी इथं पराभव झाला. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला शुन्यावर बाद व्हावं लागलं. या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

'आमच्या पक्षाने केलेला नकारात्मक प्रचार हे आमच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल घोटाळ्याचा आरोप करत आम्ही आक्रमक भूमिका घेतली. चौकीदार चोर है, या मागच्या घोषणेला चांगला प्रतिसादही मिळाला. पण तीच घोषणा आमच्यासाठी नुकसान करणारी ठरली,' असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे. याबाबत 'इंडियन एक्स्प्रेस'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, पराभवाची जबाबदारी घेत पक्ष पातळीवर अनेक नेते राजीनामे देत असून राहुल गांधी यांच्या ऑफिसमध्ये काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे. 2014 च्या पराभवानंतर काँग्रेस सावरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी आपल्या स्वभावात बदल करत आक्रमक रुप धारण केलं होतं. त्यामुळे काँग्रेस भाजपला कडवी झुंझ देईल असं चित्र निर्माण झालं होतं.

राफेलच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि चौकिदार चोर है ही घोषणा गाजल्याने त्याचा फटका भाजपला बसेल असंही बोललं जात होतं. मात्र या कुठल्याही मुद्याचा परिणाम झाला नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. महाराष्ट्रात तर अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते पराभूत झाले. त्यामुळे विविध पदांवर असलेल्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे राजीनामे पाठवायला सुरुवात केली आहे.


VIDEO: 'राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये येतील'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 12:00 PM IST

ताज्या बातम्या