अमित शहांच्या रॅलीतील हिंसेनंतर ममतांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार मोदींची तोफ

अमित शहांच्या रॅलीतील हिंसेनंतर ममतांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार मोदींची तोफ

लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे.

  • Share this:

कोलकाता, 15 मे : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीतील मोठ्या हिंसाचारानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. बंगालच्या हसनाबाद आणि डायमंड हार्बर या दोन ठिकाणी नरेंद्र मोदी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. अमित शहा यांच्या रॅलीतही मोठा हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या बंगालमधील सभांकड सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमित शहांच्या रॅलीत तुफान राडा

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या वाहनावर रोड शोदरम्यान हल्ला झाला. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकदेखील करण्यात आली.

'आमच्या रॅलीत मोठ्या प्रमाणात लोकं सहभागी झाले होते, त्यामुळे तृणमूलचे कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला. बंगालच्या जनतेनं ही गुंडगिरी वेळीच रोखलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया या गदारोळानंतर अमित शहा यांनी दिली आहे.

कोलकात्यातील रक्तरंजित राड्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नंतर घटनास्थळाला भेट परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपने यंदा पश्चिम बंगालमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. अमित शहा हे सातत्याने बंगालमध्ये तळ ठोकून आहेत. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठण्यासाठी यावेळी भाजपला बंगालमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्षानं टोक गाठलं आहे. त्यातून हिंसाचाराचेही अनेक प्रकार घडले आहेत.

बंगाली राजकारणात ऐतिहासिक ठरू शकेल अशी 2019 ची लोकसभेची निवडणूक या राज्याबरोबर देशाचा कौलही ठरवेल असं म्हटलं जातंय. बंगाली जनतेवर अनेक वर्षं राज्य करणारी डावी आघाडी उलथून टाकत ममता बॅनर्जींनी या राज्यावर चांगला जम बसवला असतानाच आता भाजपचा वारू हळूहळू बंगाल काबीज करू पाहतोय. भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोन्ही पक्ष या निवडणुकीत आधी नव्हते एवढे आक्रमक झालेले दिसले. ममता विरुद्ध मोदी असा सामना पश्चिम बंगालमध्ये रंगतो आहे.

लोकसभेसाठी बंगाली जनतेने विक्रमी मतदान केलं आहे. तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतरही हे मतदानाचं प्रमाण वाढलं आहे.

पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या 42 जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात 80 जागा तर महाराष्ट्रात 48 लोकसभा सीट्स आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर येतो.

मा, माटी, मानुष असं सांगत डाव्यांना धूर चारणाऱ्या ममता बॅनर्जी जवळपास दशकभरापासून बंगालवर प्रभुत्व गाजवत आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक एक मोठा मैलाचा दगड ठरणारी असेल.

VIDEO: 'पराभवाच्या भीतीनं ममता बॅनर्जी लोकशाही पायदळी तुडवत आहेत'

First published: May 15, 2019, 8:49 AM IST

ताज्या बातम्या