नवी दिल्ली, 28 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड मोठे बहुमत मिळवले. मोदींचा 30 मे रोजी शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी राजधानीत सुरु आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या शपथविधी कार्यक्रमासाठी बिम्सटेक (BIMSTEC)मधील सर्व प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी 2014च्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील शपथविधी कार्यक्रमात सार्क देशातील नेत्यांनी बोलवले होते. तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ देखील उपस्थित होते. पण यावेळी भारताने पाकिस्तानशी अंतर ठेवले आहे. मोदींनी यावेळी पाकिस्तानला शपथविधीसाठी आमंत्रण पाठवले नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला एअर स्ट्राईक करुन उत्तर दिले होते.
मोदींच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी बोलवले जाणार आहे. यात दक्षिणेतील अभिनेते आणि काही महिन्यांपूर्वीच राजकारणात आलेले कमल हासन यांचा देखील समावेश आहे. त्याशिवाय टीआरएस प्रमुख केसीआर आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांना देखील बोलवण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे मोदी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतली तर रेड्डी देखील त्याच दिवशी दुपारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
या देशातील प्रमुखांना आमंत्रण
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने BIMSTEC देशातील प्रमुखांना मोदींच्या शपथविधीसाठी बोलवले आहे. यात बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाल आणि भूतान या देशांचा समावेश आहे. याशिवाय मॉरिशसचे पंतप्रधान आणि किर्गिझस्तानच्या राष्ट्रपतींना देखील आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि काही मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.
VIDEO: दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल, या आणि इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Lok sabha election 2019, NDA, PM narendra modi, Politics, Ramnath kovind