GROUND REPORT : साध्वी प्रज्ञासिंह Vs दिग्विजय सिंह, कुणाचं पारडं जड?

GROUND REPORT : साध्वी प्रज्ञासिंह Vs दिग्विजय सिंह, कुणाचं पारडं जड?

भाजपसाठी ही लढत नेहमीप्रमाणे सोपी असणार नाही. कारण यावेळी काँग्रेसने या जागेवरून थेट माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना मैदानात उतरवलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 1 मे : भोपाळ लोकसभा मतदारसंघात होत असलेली लढत देशाचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या मतदारसंघात हायहोल्टेज सामना रंगणार आहे. काँग्रेसकडून दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह मैदानात आहेत, तर भाजपने त्यांच्याविरोधात वादग्रस्त साध्वी प्रज्ञासिंह यांना उतरवलं आहे.

भोपाळ मतदारसंघ हा वर्षानुवर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघातून भाजपने कुणालाही उमेदवारी दिली तरी तो उमेदवार निवडून येतो, असा अनेक वर्षांचा इतिहास आहे. परंतु यावेळी भाजपसाठी ही लढत नेहमीप्रमाणे सोपी असणार नाही. कारण यावेळी काँग्रेसने या जागेवरून थेट माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. सर्वात कठीण मतदारसंघातून तुम्ही लढा, असं मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आवाहन केल्यानंतर दिग्विजय सिंह यांना भोपाळचा मतदारसंघ निवडला.

काँग्रेसने भोपाळमधून तुल्यबळ उमेदवार दिल्यानंतर भाजपनेही नवा डाव टाकला. भाजपनं जामीनावर बाहेर आलेल्या आणि कट्टर हिंदुत्त्ववादी अशी ओळख असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली.

भाजपने का दिली प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी?

आरएसएसच्या छायेखाली तयार झालेला भाजप हा तसा जहाल हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपसमोर देशभरात कडवं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे विरोधकांना रोखायचं असल्यास नवी खेळी खेळावी लागेल, असा विचार भाजपने केल्याचं दिसत आहे. त्यामुळे फक्त भोपाळची जागा जिंकण्यासाठी नव्हे तर साध्वी प्रज्ञासिंह यांच्या निमित्ताने देशभरात धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचं बोललं जात आहे. कारण भोपाळमधून काँग्रेसच्या तिकीटावर लढत असलेल्या दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपकडून सातत्याने हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला जातो. अशातच थेट त्यांच्याविरोधातच साध्वींना उमेदवारी देऊन देशभरात या मुद्द्यावर रान उठवण्याचा भाजपचा इरादा असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

हेमंत करकरेंबाबतच्या वक्तव्याने बॅकफूटवर

साध्वी प्रज्ञासिंह यांना बॉम्बस्फोट प्रकरणात विनाकारण अडकवण्यात आलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले गेले, असा मुद्दा पुढे करून त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु याच साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. साध्वी म्हणाल्या की, माझ्या शापामुळे हेमंत करकरे यांचा सर्वनाश झाला. साध्वींच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. त्यामुळे भाजपची ही खेळी त्यांच्यावरच उलटली की काय, अशीही चर्चा सुरू झाली.

करकरेंबाबतच्या वक्तव्याचा भोपाळमध्ये परिणाम?

साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने देशभरात गदारोळ झाला. पण त्याचा भोपाळमध्ये कितपत परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जर आपल्यावर खरोखरंच अन्याय झाला, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात साध्वी यशस्वी झाल्या तर त्यांना वादग्रस्त वक्तव्याचा फटका बसणार नाही, अशी शक्यता स्थानिक पत्रकारांकडून वर्तवण्यात आली आहे.

जातीय समीकरणं कुणाच्या बाजूने?

एकूण मतदार - 19 लाख

मुस्लीम मतदार - साडेचार लाख

ब्राह्मण मतदार - चार लाख

ओबीसी आणि ठाकूर यांची लक्षणीय संख्या

भोपाळमध्ये मुस्लीम आणि ब्राह्मण मतदारांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये काँग्रेसला एकगठ्ठा मुस्लीम मतदानाची अपेक्षा आहे, तर ठाकूर मतही एकगठ्ठा आपल्याकडे येतील, अशी दिग्विजय सिंह यांची अपेक्षा आहे.  पण प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीने ठाकूर मतांची गणितं बदलण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात हिंदू-मुस्लीम अशी थेट विभागणी झाल्यास ते प्रज्ञासिंह यांच्या पथ्यावर पडणार आहे. पण दिग्विजय सिंह यांची मध्य प्रदेशातील राजकारणावरची इतक्या वर्षांची पकड पाहता, असं थेट धृवीकरण होण्याची शक्यता कमी आहे.

दिग्विजय यांच्याकडून विकासाचा मुद्दा

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्विजय यांनी या निवडणुकीत आतापर्यंत एकही वादग्रस्त वक्तव्य केलं नाही. उलटपक्षी निवडणुकांची घोषणा झाल्यापासून त्यांच्याकडून या मतदारसंघात विकासाचा मुद्दा पुढे करण्यात येत आहे. याबाबत आराखडा मतदारांपुढे ठेवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. याबाबत त्यांना कितपत यश येईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

आताच्या स्थिती कोण आहे पुढे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं भोपाळमध्ये मोठं संघटन आहे. भाजपने संघासोबतच्या चर्चेनंतरच साध्वींना उमेदवारी दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी साध्वींमागे संघाचं आणि भाजपचं असं एकत्रित संघटन उभं राहणार आहे. तसंच हा शहरी मतदारसंघ असल्याने इथं अजूनही मोदी फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकते. दुसरीकडे, काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांनी या मतदारसंघात उभं राहून आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम पत्करली आहे. दिग्विजय सिंह यांचं संघटन कौशल्य, अनुभव आणि भाजपमध्येही असलेले हितचिंतक ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे या मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ होणार आहे.

भोपाळच्या निकालाचा देशावर परिणाम

भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांच्या निमित्ताने आक्रमक हिंदुत्वाचा प्रयोग केला आहे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विराज सिंह यांनी थेट आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली त्यामुळे भोपाळमध्ये निकाल काहीही लागला तरीही त्याचा देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट

First published: May 1, 2019, 2:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading